Join us

महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले विजयी

By admin | Updated: October 20, 2014 04:21 IST

महाड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत गोगावले हे २१ हजार २११ मतांनी विजयी झाले. गोगावले यांनी काँग्रेसचे माणिक जगताप यांचा पराभव केला.

महाड : महाड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत गोगावले हे २१ हजार २११ मतांनी विजयी झाले. गोगावले यांनी काँग्रेसचे माणिक जगताप यांचा पराभव केला. २००९ नंतर यावेळी पुन्हा आ. गोगावले यांनी या मतदारसंघातून विजय मिळवत शिवसेनेचा गड कायम राखला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदय आंबोणकर यांच्यासह भाजपाच्या सुधीर महाडिक व अन्य बाकी उमेदवारांना आपली अनामत रक्कमही वाचवता आली नाही. गोगावले यांच्या विजयाबद्दल शिवसैनिकांमध्ये प्रचंड जल्लोष करण्यात येत असून सर्वत्र विजयी मिरवणुका काढण्यात येत आहेत.भरत गोगावले यांना ९४ हजार १९४ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँगे्रसचे माणिक जगताप यांना ७२ हजार ९८३ मते मिळाली. उदय आंबोणकर (राष्ट्रवादी ३२४७), प्रणय सावंत (बसपा १३०७), सुधीर महाडिक (भाजपा ३०५१), सुरेंद्र चव्हाण (मनसे २५३३), मंगेश हुमणे (बहुजन मुक्त पक्ष १०७१), लक्ष्मण निंबाळकर (अपक्ष १०१८), नोटा १२८८ मते अशी अन्य उमेदवारांना मते आहेत. या मतदार संघात एकूण १ लाख ८० हजार ६९२ मतदारांनी हक्क बजावला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ झाला. पहिल्या फेरीपासूनच आ. गोगावले यांनी जगताप यांच्यावर १३७६ मतांची आघाडी घेतली. त्यानंतर प्रत्येक फेरीत ही आघाडी वाढतच गेली. एकाही फेरीमध्ये गोगावले यांना रोखण्यात जगताप यांना यश आले नाही.२००९ मध्ये आमदार झाल्यानंतर भरत गोगावले यांनी मतदारसंघाशी दांडगा संपर्क ठेवला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांसह ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आ. गोगावले हे शिवसेना कार्यकर्त्यांशी ठाम उभे राहिले होते. त्यामुळेच या मतदार संघातील गावागावात शिवसेनेची पाळेमुळे खोलवर रुजली गेली. आ. गोगावले यांच्या विजयामुळे या मतदारसंघातील शिवसेना अभेद्य असल्याने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेला २७ हजार मतांची आघाडी मिळालेली होती. मात्र या निवडणुकीत हे मताधिक्क्य वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या पाच वर्षात मी तळागाळापर्यंतच्या माणसांपर्यंत ठेवलेला जनसंपर्क तसेच केलेली विकासकामे आणि शिवसैनिकांची घेतलेली मदत यामध्येच आपण विजयी झाल्याची प्रतिक्रिया आ. गोगावले यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)