Join us  

एकही नगरसेवक नसताना सेनेने पुन्हा विजय मिळवला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 6:53 AM

मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गीय मतदारांचे कलिना मतदारसंघात अधिक प्रमाण आहे.

मुंबई : मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गीय मतदारांचे कलिना मतदारसंघात अधिक प्रमाण आहे. मराठी, मुस्लीम, ख्रिश्चन, उत्तर भारतीयांची मते येथे निर्णायक ठरतात. या मतदारसंघात शिवसेनेचा एकही नगरसेवक नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नगरसेवक आहेत. नगरसेवक सदानंद परब यांचा अर्धा वॉर्ड या विधानसभेत येतो. असे असतानाही शिवसेनेला पुन्हा आपला विजय मिळवण्यात यश आले आहे. शिवसेनेचे उमेदवार संजय पोतनीस यांनी काँग्रेसचे उमेदवार जॉर्ज अब्राहम यांचा ४,९३१ मतांनी पराभव केला.

पोतनीस १९९७ ते २०१२ या कालखंडात मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होते. त्यांनी २०१४मध्ये भाजपच्या अमरजित सिंह यांच्यासमोर अवघ्या १३०० मतांनी निसटता विजय मिळवला होता. युती असल्यामुळे त्यांना याचा फायदा झाला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसमोर कोणताही तुल्यबळ उमेदवार विरोधकांनी दिला नाही. पोतनीस यांना एकाकी विजय मिळेल असे सांगितले जात होते. पण मनसे उमेदवार दिल्याने त्यांचे नुकसान होण्याची शक्यता होती. मनसेने २२,४०५ मते घेऊनही शिवसेनेने पाच हजार मतांनी विजय मिळविला. तर काँग्रेसचे माजी नगरसेवक ब्रायन मिरांडा यांनी काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात भूमिका घेतली.

काँग्रेस उमेदवाराविरोधात सोशल मीडियावर जोरदार प्रचार केला. त्यामुळे त्यांचा विजय आणखी सुकर झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा संधी दिली. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. जनतेने विश्वास दाखविला, मते दिली. हा विजय जनतेचा आहे, असे नवनिर्वाचित आमदार संजय पोतनीस यांनी सांगितले.

टॅग्स :कालिनाशिवसेना