Join us

शिवसेनेने दिला दिग्गजांना धक्का

By admin | Updated: October 20, 2014 03:08 IST

पंचरंगी लढती, अंतर्गत गटबाजी, प्रस्थापितांबद्दल असलेली नाराजी, जाती-धर्माची समीकरणे या पार्श्वभूमीवर मुंबईतील लढतींचे अनपेक्षित निकाल लागले

मुंबई : पंचरंगी लढती, अंतर्गत गटबाजी, प्रस्थापितांबद्दल असलेली नाराजी, जाती-धर्माची समीकरणे या पार्श्वभूमीवर मुंबईतील लढतींचे अनपेक्षित निकाल लागले. विधानसभा लढतीचे अनेक ठिकाणचे निकाल धक्कादायक ठरले. कुठे तुलनेने कमकुवत उमेदवार तुल्यबळांना नमवून जायंट किलर ठरले. कुठे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला. या सर्वांमध्ये शिवसेनेने मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेच्या दिग्गजांना धक्का देत मुंबईतील अस्तित्व ठळकपणे नमूद केले.युती-आघाडी तुटल्याने पाच उमेदवार रिंगणात उतरले आणि त्यामुळेच मुंबईतल्या बहुतांश मतदारसंघांत अनपेक्षित लढती झाल्या. यात सर्वात धक्कादायक निकाल विक्रोळी, कुर्ला, कलिना, शिवडी, सायन कोळीवाडा, वरळी, भायखळा, अंधेरी पूर्व व पश्चिम, चेंबूर, अणुशक्तीनगर, माहीम या मतदारसंघातून लागले. शिवसेनेचे उमेदवार सुनील शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांना २३ हजार मतांची आघाडी घेत धूळ चारली. शिंदेंसमोर भाजपाचे सुनील राणे आणि विजय कुडतरकर या मराठी उमेदवारांचे आव्हान होते. या दोघांमध्ये मराठी मतांची विभागणी होऊनही शिंदेंनी वरळीवर कब्जा केला. कलिना या बहुभाषिक मात्र त्यातही मुस्लीम व उत्तर भारतीयांचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघातून शिवसेनेचे संजय पोतनीस विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे नेते व माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह आणि आयत्या वेळी मनसेतून राष्ट्रवादीच्या तंबूत परतलेले कप्तान मलिक यांना चारी मुंड्या चीत केले. कप्तान हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते व ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचे धाकटे बंधू. मलिक यांनी त्यांच्या (अणुशक्तीनगर) मतदारसंघापेक्षा कलिन्यात कप्तान यांच्यासाठी जास्त प्रचार केला होता. बहुधा यामुळेच त्यांनाही शिवसेनेकडून पराभूत व्हावे लागले. शिवसेनेचे विभागप्रमुख तुकाराम काते यांनी अणुशक्तीनगरमध्ये मलिक यांना पाणी पाजले. मतमोजणीत मलिक-काते यांच्यातील लढत अखेरच्या फेरीपर्यंत रंगली. यात कधी कधी मलिक पुढे राहिले तर कधी काते. शिवडीच्या लढतीत शिवसेनेचे अजय चौधरी जायंट किलर ठरले. येथून मनसेचे बाळा नांदगावकर रिंगणात होते. मराठमोळ्या शिवडीत या दोघांमध्ये हातघाई होईल असा अंदाज होता. मात्र चौधरींनी नांदगावकरांवर सुमारे ४२ हजार मतांची आघाडी घेत तो खोटा ठरवला. अंधेरी पूर्वेतून माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी या हेवीवेट काँग्रेस नेत्याला पाडून शिवसेनेचे रमेश लटके जायंट किलर ठरले. कुर्ला या मुस्लीमबहुल मतदारसंघातून शिवसेनेचे मंगेश कुडाळकर निवडून आले. त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार मंगेश अण्णा कांबळे यांना धूळ चारली. त्यांच्यासोबत कुडाळकर यांच्यासमोर एमआयएमचे अविनाश बर्वे, भाजपाचे विजय कांबळे व मनसेच्या स्नेहल जाधव यांचे कडवे आव्हान होते. मात्र ते पेलत कुडाळकर यांनी कुर्ल्यावर भगवा फडकावला. (प्रतिनिधी)