Join us  

BMC निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचा बिग प्लॅन; तब्बल १ हजार ७७५ कोटी खर्च करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 8:25 PM

रेल्वे मार्गावरुन जाणारे पूल धोकादायक स्थितीत आहेत. यामध्ये दक्षिण मुंबईतील शंभर वर्षे जुन्या पुलांचाही समावेश आहे.

मुंबई - पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक असल्याने बराच काळ रखडलेल्या कामांनाही गती मिळू लागली आहे. त्यानुसार मुंबईतील १२ धोकादायक पुलांच्या विकासाचा आराखडा तयार झाला आहे. यासाठी एक हजार ७७५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या पुलांवर आकर्षक रोषणाई करण्याची मागणीही केली जात आहे.

रेल्वे मार्गावरुन जाणारे पूल धोकादायक स्थितीत आहेत. यामध्ये दक्षिण मुंबईतील शंभर वर्षे जुन्या पुलांचाही समावेश आहे. हे जुने पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मात्र, हे काम संथगतीने सुरु आहे. मात्र आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी शिवसेनेने(Shivsena) पुलांच्या कामाला प्राधान्य दिले आहे. त्यानुसार १२ पूल नव्याने बांधण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.

महाराष्ट्र रेल इंन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून हे पुल बांधण्यात येणार आहे.त्यासाठी पालिकेकडून निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पुढील वर्षाभरात टप्प्याटप्प्याने काम सुरु करुन २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. केबल स्टेड पध्दतीचे पूल बांधण्यात येणार असल्याने बांधकाम रखडणार नाही. तसेच, हे पूल पर्यटकांचेही आकर्षण ठरतील, असा दावा स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला. 

वाहतूक कोंडी सुटणार

भायखळा येथील व्हाय ब्रिज वगळता इतर रेल्वे मार्गावरील पूल हे दुपद्री आहेत. दक्षिण मुंबईतील सर्व पूल  ब्रिटीशकालीन आहेत. नवीन पूल चौपद्री असणार आहेत. असतील. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटणार आहे.

पूल आणि खर्च  (कोटींमध्ये)

रे रोड - १७५

दादर टिळक पूल - ३७५

घाटकोपर - २००

भायखळा व्हाय पूल - २००

बेलासीस मुंबई सेंट्रल - १५०

चिंचपोकळी आर्थर रोड पूल - २५०

माझगाव ऑलिवंट - ७५

करीरोड - १५०

माटुंगा पूल - २५०

एस ब्रिज भायखळा - ५०

लोअर परळ - १००

महालक्ष्मी - १००

टॅग्स :शिवसेनामुंबई महानगरपालिकानिवडणूक