Join us  

संजय राऊत लीलावती रुग्णालयात होणार दाखल; त्रास वाढू लागल्यानं पुन्हा अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय

By मुकेश चव्हाण | Published: December 02, 2020 12:27 PM

संजय राऊत यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ह्रदयाविकाराशी संबंधीत उपचार सुरू आहे.

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज (बुधवारी) लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. संजय राऊत यांच्यावर गुरुवारी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. लीलावती रूग्णालयातील प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ञ डॉ मॅथ्यू हे संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी करणार आहे. २०१९मधील नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. संजय राऊत यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ह्रदयाविकाराशी संबंधीत उपचार सुरू आहे.

संजय राऊत यांनी शनिवारी लीलावती रुग्णालयात आरोग्य तपासणी केली होती. त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र त्यांना काहीसा ताण आणि थकवा जाणवत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्रास वाढू लागल्यानं पुन्हा अँजिओप्लास्टी करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता.संजय राऊत यांच्यावर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या हृदयाला दोन स्टेन बसविण्यात आल्या होत्या. 

दरम्यान, राज्यातील गुंतवणूक वाढावी, प्रस्तावित फिल्म सिटी मार्गी लावण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. योगी आदित्यनाथ या दौऱ्यात काही बॉलिवूड कलाकार, दिग्दर्शकांशी देखील संवाद साधणार आहेत. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईतील फिल्मसिटी उत्तर प्रदेशला हलविणार असल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर त्यांनी तेथे फिल्मसिटी उभारण्याच्या कामांना गतीही आहे. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या या भूमिकेवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

मुंबईची फिल्मसिटी अशी कोणाला हलवता येते का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच देशात फिल्मसिटी काय फक्त मुंबईतच आहे का? तामिळनाडूतही फिल्मसिटी आहे. तिडेही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जाणार आहेत का? की त्यांनी केवळ मुंबईशीच पंगा घेतलाय, असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांना विचारला आहे.

योगी आदित्यनाथ हे साधू आहेत. महाराज आहेत. उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानिमित्ताने ते काही कलाकारांना भेटले. अक्षयकुमारलाही भेटले. अक्षयकुमार कदाचित त्यांना आंब्याच्या पेट्या घेऊन गेला असेल, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. मुंबईतील फिल्मसिटी एका रात्रीत उभी राहिलेली नाही. त्यामागे अनेक वर्षांची मेहनत आणि कष्ट असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :संजय राऊतडॉक्टरहॉस्पिटल