सायली कडू, मुंबईमराठी मतदारांचे प्राबल्य असलेल्या मागाठाणे मतदासंघात या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-मनसेत खरी लढत रंगणार आहे. गेल्या निवडणुकीत मनसेचे प्रविण दरेकर १३ हजारांच्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रकाश सुर्वे यांनी त्यांना कडवी झुंज देत तब्बल ४५ हजार मते घेतली होती. या लढतीत सुर्वे शिवसेनेकडून रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे गेल्या लढतीतले प्रतिस्पर्धी पुन्हा समोरासमोर आल्याने इथल्या लढतीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.त्याव्यतिरिक्त भाजपाकडून माजी आमदार हेमेंद्र मेहता, राष्ट्रवादीतर्फे सचिन शिंदे आणि यंदा प्रथमच काँग्रेसतर्फे सचिन सावंत हे अन्य तीन उमेदवारही रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेत येथून महायुतीचे उमेदवार गोपाळ शेटटी तब्बल साडेचार लाखांच्या मताधिक्क्याने निवडून आले. मात्र महायुतीतून शिवसेना बाहेर पडली. त्यानंतर शिवसेनेकडून मराठी विरूद्ध गुजराती असा प्रचार सुरू झाला. मनसेनेही याच मुद्यावर पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट टीका करण्यास सुरूवात केली. या पार्श्वभूमीवर मराठी मतांचे सुर्वे, दरेकर यांच्यात कसे विभाजन होते त्यावर विजय कोणाचा हे ठरेल, अशी चर्चा मतदारसंघात आहे.येथे सुमारे सव्वालाख (४४ टक्के)मराठी मतदार आहेत. त्याखालोखाल २९ हजार (१० टक्के) गुजराती मतदार आहेत. मराठी-गुजराती वादाच्या पार्श्वभूमीवर मेहता यांना प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात बरीच धडपड करावी लागणार आहे. पाच वर्षांमध्ये आमदार म्हणून केलेली कामे, दांडगा जनसंपर्क ही दरेकर यांची जमेची बाजू असेल. तर राष्ट्रवादीत असताना मतदारसंघाची केलेली बांधणी, शिवसेनेत आल्यानंतर शिवसैनिकांकडून मिळणारे पाठबळ यामुळे सुर्वेंचे पारडे जड मानले जात आहे. तर राष्ट्रवादीची मते स्वत:कडे राखण्याचे आव्हान शिंदे यांच्या समोर आहे. गेल्या लढतीत मनसेच्या दरेकरांना ५८ हजार तर राष्ट्रवादीकडून लढताना सुर्वेंना ४५ हजार मते पडली होती. सुमारे ३६ हजार मते घेऊन शिवसेनेचे अशोक नर तिसऱ्या क्रमांकावर होते. आता हीच मते दरेकर, सुर्वें यांच्यामध्ये विभागली जाणार असल्याने मतविभागणी टाळण्यात ज्या नेत्याला यश येईल, तोच मागाठाणे मतदारसंघातून विजयी होणार, हे निश्चित.
शिवसेना-मनसेत जोरदार टक्कर
By admin | Updated: October 10, 2014 02:35 IST