लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘वीरप्पन गॅंग’वरून शिवसेना आणि मनसेत शुक्रवारी टि्वटर वाॅर रंगला. मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांच्या वीरप्पन गँगने घोटाळे चालविल्याचा आरोप मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला, तर खरे वीरप्पन कोण हे जनतेला चांगलेच माहिती आहे, असा पलटवार करत युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी मनसेवरच खंडणीखोरीचा आरोप केला.
‘वीरप्पनने लोकांना लुटले नसेल, त्यापेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटले आहे. मुंबई महापालिकेत वीरप्पन गँग कार्यरत आहे. या वीरप्पन गँगने महापालिकेची भरमसाठ लूट चालवली आहे. अनेक घोटाळे केले जात आहेत. स्थायी समितीची कामेही याच गँगला दिली जात आहेत. आता अशा गँगचा एन्काउण्टर करावाच लागेल. रस्त्यांचा घोटाळा, नालेसफाईचा घोटाळा आता कोरोनाच्या काळातील घोटाळा असे किती तरी घोटाळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केले आहेत. जनतेला जर यातून दिलासा द्यायचा असेल तर यांचा वध करावाच लागेल. यासाठी मनसे पुढाकार घेईन, अशा आशयाचे टि्वट संदीप देशपांडे यांनी केले. यावर, खरे वीरप्पन कोण, हे जनतेला चांगलेच माहिती आहे. आपल्यालाही माहीत करून घ्यायचे असेल तर ‘मनसे खंडणी’ असे फक्त गुगल सर्च करून बघावे. गुगलच्या पहिल्याच पानावरच या बातम्या सापडतील. सगळ्या बातम्या वेगवेगळ्या आहेत; पण प्रत्येक जिल्हातील यांची स्टोरी सेम टू सेम आहे,’ असे उत्तर देत वरुण देसाई यांनी मनसेवर खंडणीखोरीचा आरोप केला.
यावर, मी वीरप्पनबद्दल बोललो होतो, वरुणला का झोंबले माहीत नाही, असे म्हणत संदीप देशपांडेंनी पलटवार केला.