Join us  

'पराभवातूनही बोध न घेणाऱ्या राणे पिता-पुत्रांना जनता जागा दाखवेल'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 4:31 PM

माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील छत्तीसचा आकडा सगळ्यांनाच ठाऊक आहे.

ठळक मुद्देशिवसेना आणि राणे यांच्यात सुरू असलेली शाब्दिक चकमक हळूहळू आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.शिवसेनेविरोधात काही मतदारसंघांमध्ये उमेदवार उतरवण्याच्या हालचाली राणेंनी सुरू केल्याचं कळतं.

अनेक निवडणुकांमध्ये पराभव पदरी पडल्यानंतरही, नारायण राणे आणि त्यांचा मुलगा त्यातून बोध घेत नाहीत. आजही ते पूर्वीसारखंच बोलत आहेत. त्यामुळे यावेळीही जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल, अशी चपराक गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी लगावली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राणे यांच्यात सुरू असलेली शाब्दिक चकमक हळूहळू आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील छत्तीसचा आकडा सगळ्यांनाच ठाऊक आहे. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत त्यांच्यात रंगलेला सामना, एकमेकांवर केले गेलेले प्रहारही चांगलेच गाजलेत. तसंच चित्र आताही दिसू लागलंय. निलेश राणेंनी थेट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नारायण राणेंनी तो दावा फेटाळला असला, तरी शिवसेनेनं नीतीमत्ता सोडून स्वार्थासाठीच युती केल्याची टिप्पणी त्यांनी केलीय. त्यालाच उत्तर देण्यासाठी शिवसेना नेते सरसावले आहेत.

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणेंनी स्वतःचा पक्ष स्थापन केला असला, तरी काही महिन्यांपासून ते भाजपाच्या जवळ होते. भाजपाने त्यांना राज्यसभेची खासदारकीही दिलीय. परंतु, भाजपा आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार असल्यानं राणेंची पंचाईत झाली आहे. अर्थात, शिवसेनेविरोधात काही मतदारसंघांमध्ये उमेदवार उतरवण्याच्या हालचाली राणेंनी सुरू केल्याचं कळतं. 

दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून सध्याचे खासदार विनायक राऊत यांनाच उमेदवारी देणार असल्याचं दीपक केसरकर यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं. 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०१९नारायण राणे शिवसेना