मनोहर कुंभेजकर, मुंबई-कांदिवलीमधील मराठी माणसाचे दुकान हडप करणाऱ्या लालसिंह राजपुरोहित यांची परत चारकोप-कांदिवली पूर्वचे प्रभारी विभागप्रमुखपदी शिंदे सेनेने नियुक्ती केली आहे.शिंदे सेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राजपुरोहित यांची शिंदे सेनेच्या प्रभारी विभागप्रमुख ( कार्यक्षेत्र - चारकोप व कांदिवली पूर्व विधानसभा ) पदी एक वर्षाच्या कालाविधीसाठी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रक आज शिंदे सेनेचे सचिव संजय मोरे यांनी जारी केल्याने येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या ठिकाणी मराठी भाषिक असलेली मोठी वस्ती लक्षात घेता मराठी पदाधिकाऱ्यांना प्रभारी विभागप्रमुख पदी नियुक्ती करावी अशी जोरदार मागणी असतांना, परत मराठी माणसाचे दुकान हडप करणाऱ्या राजपुरोहित यांना बक्षिस म्हणून सदर नियुक्ती केल्याबद्धल येथील येथे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दि,२८ डिसेंबर रोजी राजपुरोहित आणि त्याच्या सहा कार्यकर्त्यांविरोधात पालिकेच्या रस्ते बांधकाम ठेकेदाराकडून खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात कांदिवली पोलिसांनी त्यांना व पदाधिकाऱ्यांना अटक केली होती.
तर कांदिवलीमधील मराठी माणसाचे दुकान हडप केल्या बद्धल राजपुरोहित यांना पक्षातून दि,८ मार्च रोजी निलंबित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला होता.याप्रकरणी राजपुरोहित यांना पोलिसांनी त्यावेळी अटक केली होती.
राजपुरोहित याची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर त्याने हडप केलेले दुकान शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पै कुटुंबाच्या स्वाधीन केले. दुकानाची चावी पुन्हा मिळाल्याने दत्ताराम पै आणि सुषमा पै भावूक झाले होते. या संदर्भात लोकमतने दि,१२ मार्चच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते.