Join us  

मनसे महामेळाव्याला शिवसेनेचे मुख्यमंंत्र्यांच्या सत्कारातून उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 4:55 AM

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शिवसैनिकाला विराजमान करण्याचे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना दिलेले वचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केले आहे.

मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शिवसैनिकाला विराजमान करण्याचे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना दिलेले वचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केले आहे. आज राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या वचनपूर्तीबद्दल २३ जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंती दिनी शिवसैनिकांकडून उद्धव ठाकरे यांचा जंगी सत्कार केला जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी दिली. त्यामुळे आता एकाच दिवशी मनसेचा महामेळावा आणि शिवसेनेची जंगी सभा पाहायला मिळणार आहे.२३ जानेवारी रोजी मनसेचा महामेळावा होत आहे. या मेळाव्यात मनसेच्या झेंड्याचा रंग बदलण्यात येणार आहे. शिवरायांच्या राजमुद्रेसह केशरी, भगवा रंग स्वीकारत मनसे हिंदुत्वाची कास धरणार असल्याची चर्चा सुरू आहे. बाळासाहेबांच्या जयंतीचा मुहुर्त साधत स्वत: राज ठाकरे यांच्याकडून पक्षाच्या मेळाव्यात पुढील वाटचालीबाबत घोषणा होणार असल्याचे मनसे नेते सांगत आहेत. मनसेची हिंदुत्वाची वाट शिवसेनेला अडचणीची ठरू शकते.मनसेच्या महामेळाव्याला उत्तर म्हणून शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव यांच्या जंगी सत्काराची तयारी सुरू केली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर हा सत्कार सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला ५० हजाराहून अधिक शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातून पदाधिकारी आणि शिवसैनिक येणार आहेत. त्याशिवाय, राजकीय नेते, उद्योजक, कलाकारही सत्काराला मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतील, अशी माहिती मंत्री अनिल परब यांनी दिली.