Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना शाखाप्रमुखावर केला गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भिवंडीत ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात असलेले शिवसेना शाखाप्रमुख ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी : भिवंडीत ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात असलेले शिवसेना शाखाप्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर रविवारी मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी गोळीबार केला. सुदैवाने म्हात्रे आणि त्यांची पत्नी या हल्ल्यातून बचावले. राजकीय वादातून गोळीबार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

ही घटना म्हात्रे यांच्या घरासमोर घडली असून ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत म्हात्रे हे उमेदवार असून मध्यरात्रीच्या सुमारास ते घरी येत असताना अचानक त्यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तीन वेळा गोळीबार केला. घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

काही वर्षांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वादातून काँग्रेसचे नगरसेवक मनोज म्हात्रे यांची हत्या झाली होती. त्यानंतर आता पुन्हा ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत सेनेच्या शाखाप्रमुखावर गोळीबार झाल्याने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेच्या तपासासाठी रात्रीपासूनच पथके नेमून हल्लेखोरांचा तपास सुरू असल्याची माहिती नारपोली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र वाणी यांनी दिली.