Join us
Daily Top 2Weekly Top 5

न्यू दिंडोशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक लोकार्पण सोहळ्यावरून शिवसेना व मनसेत जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:06 IST

मुंबई: न्यू दिंडोशी म्हाडा व नागरी निवारा वसाहत येथील चौकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग व छत्रपती शिवाजी महाराज ...

मुंबई: न्यू दिंडोशी म्हाडा व नागरी निवारा वसाहत येथील चौकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग व छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नाव देण्यात येणार आहे. या चौकात एक मूर्ती बसविण्यात आली असून, त्याचे लोकार्पण का होत नाही यावरून सध्या शिवसेना व मनसेत राजकीय वातावरण तापले आहे. या विषयावर भाष्य करताना नगरसेवक तुळशिराम शिंदे यांनी सांगितले की, पुतळ्याजवळ आसपास सुशोभीकरण व विद्युत रोषणाईचे काम अजून बाकी आहे. ते लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर तत्काळ लोकार्पण सोहळा पार पडेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा करायला शिवसेनेला वेळ नसेल तर मनसे याचे लोकार्पण करेल, असा इशारा मनसे दिंडोशी तालुका अध्यक्ष अरुण सुर्वे यांनी दिला होता. यावरून येथील राजकीय वातावरण तापले होते. पोलिसांनी या लोकार्पण सोहळ्याला परवानगी नाकारली होती.

मनसेचे प्रभाग क्रमांक ४० चे शाखाध्यक्ष विजय बोहरा यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज या दोन महान व्यक्ती आपणा सर्वांना पूजनीय असून, याचे राजकारण कोणी करू नये; परंतु तांत्रिकदृष्ट्या आपण पाहायला गेले तर हा जो पुतळा बसविला आहे, त्यात शिवाजी महाराज नसून एक मावळा तुतारी वाजवत आहे. त्याने राज मुद्रेवर पाय ठेवून वाजवित असल्याचे दिसत आहे. हे मी महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले; परंतु अजून काहीच कार्यवाही झाली नाही. पुतळा लावण्यास आपला विरोध नाही; पण सुधारणा हवी, असे त्यांनी स्पष्ट केले.

-----------------------------------------