ठाणे : दिवाळीनंतर साकार होणारे मंत्रीमंडळ बहुधा भाजपा-सेना-मित्रपक्ष असे असण्याची स्पष्ट चिन्हे दिसत असून त्यात ठाणे जिल्ह्यातून शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख व संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे यांना व डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण अथवा ठाणे शहरचे आमदार संजय केळकर यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. गणेश नाईक यांचा पराभव करून विजयी झालेल्या बेलापूरच्या भाजपा आमदार मंदाताई म्हात्रे यांनाही राज्य मंत्रीपद मिळण्याची चिन्हे असून ते शक्य झाले नाही तर त्यांना मोठ्या महामंडळाचे (सिडको) चेअरमनपद दिले जाण्याची शक्यता आहे. मंदाताई यापूर्वी विधान परिषदेच्या आमदार होत्या. हे लक्षात घेता ही त्यांची आमदारकीची दुसरी टर्म ठरणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपात आलेले व कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे अध्यक्षपद भूषविणारे मुरबाडचे किसन कथोरे यांनाही एखादे महत्वाचे महामंडळ दिले जाण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्याने १८ पैकी भाजपाचे ७ व सेनेचे ६ असे १३ आमदार निवडून दिले आहेत. हे लक्षात घेता मंत्रीमंडळात ठाण्याला वजनदार स्थान मिळण्याची शक्यता आहे. रविंद्र चव्हाण हे दुसऱ्यांना आमदार म्हणून विजयी झाले आहेत. तर केळकरांची ही दुसरी टर्म आहे. परंतु या आधी ते विधान परिषदेचे आमदार होते. तर आता ते ठाणे शहर मतदार संघातून विजयी झाले आहेत. हे लक्षात घेता रविंद्र चव्हाण यांची ज्येष्ठता मोठी ठरते त्यांचे आणि केळकर यांचे समाजकार्य आणि जनसंपर्क तसा तुल्यबळ त्यामुळेच यापैकी कोणाला संधी मिळते. याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपचे जे ७ आमदार निवडून आले आहेत. त्यात भिवंडी पश्चिम महेश चौगुले कल्याण पश्चिम नरेंद्र पवार, मीरा-भाईंदर नरेंद्र मेहता हे हे तिघे प्रथमच आमदार झाले आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रीपदे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. (विशेष प्रतिनिधी)
शिंदे, चव्हाणांना मंत्रीपद?
By admin | Updated: October 23, 2014 23:48 IST