Join us

शेवाळेंनी रोखली गायकवाडांची हॅट्ट्रिक

By admin | Updated: May 17, 2014 02:39 IST

दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघावर गेल्या १० वर्षांपासून एकनाथ गायकवाड यांचे वर्चस्व होते. ते मोडीत काढत राहुल शेवाळे यांनी गायकवाड यांची विजयाची हॅट्ट्रिक रोखली आहे.

 दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघावर गेल्या १० वर्षांपासून एकनाथ गायकवाड यांचे वर्चस्व होते. ते मोडीत काढत राहुल शेवाळे यांनी गायकवाड यांची विजयाची हॅट्ट्रिक रोखली आहे. शेवाळे यांनी ३ लाख ८१ हजार 00८ मते घेत दणदणीत विजय मिळवला आहे. यंदाच्या निवडणुकीत मनसे फॅक्टर फेल झाल्याने आणि मतदारांमध्ये असलेल्या नाराजीने गायकवाड यांचा विजयाचा रथ रोखला आहे. आम आदमी पार्टीलाही मतदारांनी हवा तसा प्रतिसाद न दिल्याने आपच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचा २00४च्या निवडणुकीत पराभव करून गायकवाड यांनी या मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा फडकवला होता. त्यानंतरच्या २00९च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सुरेश गंभीर यांचा पराभव करीत गायकवाड यांनी मतदारसंघावर आपली पकड अधिक घट्ट केली होती. यंदाची ही निवडणूक गायकवाड यांच्यासाठी हॅट्ट्रिकची होती. परंतु त्यांच्या विजयाचा रथ राहुल शेवाळे यांनी रोखला. पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शेवाळे यांनी सर्व ताकदीनिशी गायकवाड यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले होते. देशभरात काँग्रेसविरोधी वातावरण पसरल्याचा फायदा शेवाळे यांना झाला. लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा क्षेत्रात शेवाळे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. शेवाळे यांनी प्रत्येक मतदारसंघात ५0 ते ७५ हजारांची मते घेतली. मनसेचा बालेकिल्ला बनलेल्या माहीम मतदारसंघात ७४ हजार ६५७ मतांची आघाडी घेत शेवाळे यांनी दादरवर शिवसेनेचा झेंडा फडकावला आहे. मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदाही शेवाळे यांना झाला. २00९च्या निवडणुकीत मनसेची लाट होती. त्या निवडणुकीत मनसेने १ लाख ८ हजार मते घेतली होती. त्याचा फायदा गायकवाड यांना झाला होता. या निवडणुकीत मनसे फॅक्टर अपयशी ठरल्याने आणि मतदारांमधील नाराजी शेवाळेंच्या विजयाने स्पष्ट झाली आहे. गायकवाड यांना २ लाख ४२ हजार ८२८ मते मिळाली. मनसेचे उमेदवार आदित्य शिरोडकर यांना ७३ हजार 0९६ मते मिळाली. आपचे उमेदवार सुंदर बालकृष्णन यांना २७ हजार ६८७ मते मिळाली आहेत; तसेच बसपाचे अ‍ॅड. गणेश अय्यर यांना १४ हजार ७५४ मते मिळाली आहेत. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून राहुल शेवाळे यांनी आघाडी घेतली ती अखेरच्या २१व्या फेरीपर्यंत. गायकवाड आणि शिरोडकर हे प्रत्येक फेरीत मागे पडत असल्याने सकाळी ११ वाजताच शेवाळे यांचा विजय निश्चित झाला होता. ९,५८२ मतदारांचा ‘नोटा’वर शिक्का यंदाच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने मतदानाच्या नोटा (यापैकी कुणीही नाही) पर्यायाविषयी जनजागृती केली होती. याला या मतदारसंघातील मतदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. सुमारे ९ हजार ५८२ मतदारांनी नोटा पर्याय वापरला आहे. दरम्यान, या मतदारसंघात ७ लाख ६८ हजार ७५0 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी १२३ मते अवैध ठरली आहेत. निवडणुकीत २१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या उमेदवारांना एकूण ६२0 मते पोस्टाने आली.