Join us

शेंडगे, जाधव, डोंगरे राष्ट्रवादीच्या दारी

By admin | Updated: September 27, 2014 00:29 IST

उमेदवारीचा घोळ : जयंतराव, आर. आर. यांचा सांगलीत तळ

सांगली : आघाडी, महायुतीला तिलांजली मिळाल्यानंतर आज, शुक्रवारी जिल्ह्यातील राजकीय पक्षांची उमेदवारी निश्चितीसाठी धावपळ सुरू होती. भाजपचे आमदार प्रकाश शेंडगे, काँग्रेसकडून ऐनवेळी उमेदवारी रद्द केलेले मिरजेचे प्रा. सिद्धार्थ जाधव, भाजपमधील इच्छुक शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे यांनी सायंकाळी राष्ट्रवादीतून उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले होते. त्यामुळे राष्ट्रवादीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांचे चेहरे हिरमुसले. काँग्रेसने मिरजेतून सी. आर. सांगलीकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याचे सांगण्यात आले, तर तिकीट कापल्याने सांगलीचे आमदार संभाजी पवार यांनी भाजपची साथ सोडून शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ हाती घेतला. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी कोंडी झाली आहे. तुल्यबळ उमेदवारांच्या शोधासाठी आज दुपारपासून सांगलीत गृहमंत्री आर. आर. पाटील व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी तळ ठोकला होता. सांगली, मिरज, जत आणि पलूस-कडेगाव या चार मतदारसंघांतील इच्छुकांची चाचपणी सुरू होती. सायंकाळी काँग्रेस, भाजपमधील इच्छुकांनी राष्ट्रवादीचे कार्यालय गाठल्याने खळबळ उडाली. सांगलीतून सुरेश पाटील, दिनकर पाटील, मैनुद्दीन बागवान यांनी उमेदवारीची मागणी केली. याचवेळी तेरा दिवसांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले जिल्हा परिषद सदस्य शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी समर्थकांसह राष्ट्रवादीचे दार ठोठावले. डोंगरेही सांगलीतून इच्छुक असून, आर. आर. पाटील व जयंत पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली. यामुळे सांगलीतील इच्छुकांत अस्वस्थता पसरली. महापालिका निवडणुकीवेळी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसची साथ देणाऱ्या माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनीही सांगली मतदारसंघातून राष्ट्रवादीकडे मागणी केली. मिरजेतून काँग्रेसतर्फे प्रा. सिद्धार्थ जाधव यांच्या नावाची घोषणा पतंगराव कदम यांनी केली होती; पण आज सायंकाळी सी. आर. सांगलीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे वृत्त धडकताच जाधव यांनी राष्ट्रवादीचे कार्यालय गाठले. जाधव यांच्यासह बाळासाहेब होनमोरे, योगेंद्र थोरात यांनी उमेदवारीवर दावा केला आहे. राष्ट्रवादीने जतमधून प्रभाकर जाधव व रमेश पोलिसी-पाटील यांना उमेदवारी अर्ज  भरण्यास सांगितले. भाजपचे आमदार प्रकाश शेंडगे यांच्याशीही राष्ट्रवादीने संपर्क ठेवला आहे. पृथ्वीराज देशमुख यांनी भाजपमधून उमेदवारी अर्ज भरल्याने पलूस-कडेगावमधून अरुण लाड यांनी राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढविण्यास नकार दिला. परिणामी, उमेदवारांचा शोध घेऊन अखेरीस मोहनराव यादव (कडेपूर) व सुरेखा लाड यांना अर्ज भरण्यास सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीचा चार, तर काँग्रेसचा तीन जागी शोध सुरूचराष्ट्रवादीसोबतच भाजपनेही आज धक्कातंत्राचा अवलंब करत सांगलीतून आमदार संभाजी पवार यांचा पत्ता कट केला. त्यानंतर पवार यांनी पुत्र पृथ्वीराज व गौतम यांच्यासह शिवसेनेत प्रवेश करीत असल्याची घोषणा केली. उद्या, शनिवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादीत चार, तर काँग्रेसमध्ये तीन मतदारसंघांतील उमेदवारांचा घोळ कायम होता. इस्लामपूर मतदारसंघातून एकास एक उमेदवार देण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी सायंकाळी तळ ठोकला होता.

राष्ट्रवादीचा चार, तर काँग्रेसचा तीन जागी शोध सुरूचराष्ट्रवादीसोबतच भाजपनेही आज धक्कातंत्राचा अवलंब करत सांगलीतून आमदार संभाजी पवार यांचा पत्ता कट केला. त्यानंतर पवार यांनी पुत्र पृथ्वीराज व गौतम यांच्यासह शिवसेनेत प्रवेश करीत असल्याची घोषणा केली. उद्या, शनिवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादीत चार, तर काँग्रेसमध्ये तीन मतदारसंघांतील उमेदवारांचा घोळ कायम होता. इस्लामपूर मतदारसंघातून एकास एक उमेदवार देण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी सायंकाळी तळ ठोकला होता.महाडिक की वैभव नायकवडी?इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी सांगलीत रात्री उशिरापर्यंत काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी, नानासाहेब महाडिक, हुतात्मा संकुलाचे अध्यक्ष वैभव नायकवडी, राहुल महाडिक, बाबा सूर्यवंशी यांची बैठक सुरू होती. तेथे ‘स्वाभिमानी’कडून महाडिक व नायकवडी यांच्यापैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.