Join us

शहांनी स्वीकारले उद्धव ठाकरेंचे निमंत्रण, 'मातोश्री'वर घेणार भेट

By admin | Updated: September 4, 2014 14:12 IST

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे आज रात्री 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.

मुंबई : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे निमंत्रण स्वीकारले असून आज रात्री ते 'मातोश्री'वर उद्धव यांची भेट घेतील, असे भाजप नेते विनोद तावडे यांनी सांगितले. उद्धव यांच्या भेटीनंतर शहा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीचेही दर्शन घेणार आहेत. शहा यांच्या या निर्णयामुळे शिवसेना -भाजपामधील तणाव सध्या निवळला आहे.
गुरूवारच्या मुंबई भेटीत ‘मातोश्री’वर येण्याचे निमंत्रण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. हे निमंत्रण स्वीकारत शहा आजा रात्री ९.३० वाजात मातोश्रीवर जाणार आहेत.
शहा यांचे गुरुवारी मुंबईत भरगच्च कार्यक्रम आहेत. पण यात मातोश्रीची भेट नव्हती. विधानसभेच्या जागावाटपावरून भाजपा आणि शिवसेनेत निर्माण झालेला तणाव, स्वबळाची सुरू असलेली भाषा या पाश्र्वभूमीवर शहा मातोश्रीवर जातील की नाही, याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. अकेर त्यांना पूर्णविराम मिळाला आहे.
स्वत: उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शहांना फोनवरून मातोश्रीवर येण्याचे निमंत्रण दिले. तत्पूर्वी, शिवसेनेची बाजू मांडण्याची जबाबदारी असलेल्या एका खासदाराने शहा यांच्या कार्यालयात ‘मातोश्री’ भेटीचे निमंत्रण देऊन पाहिले. पण, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना लालकृष्ण आडवाणींपासून भाजपाचे सगळेच मोठे नेते त्यांना भेटायला जात असत. मात्र आताच्या परिस्थितीत भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना ‘मातोश्री’वरून आमंत्रण 
मिळाले पाहिजे, अशी भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाची भूमिका आहे, असेही सूत्रंनी 
सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
 
भेटीवरून रस्सीखेच
अमित शहा यांच्या मुंबई भेटीत त्यांनी मातोश्रीवर पायधूळ झाडण्यावरून भाजप व शिवसेनेत रस्सीखेच सुरु  होती.  शिवसेना जोर्पयत जागा वाढवून देत नाही तोर्पयत शहा यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ नये, असा भाजपाच्या महाराष्ट्रातील नेत्यांना वाटत होते तर केंद्रातील सरकारला बहुमत असले तरी हे रालोआचे सरकार आहे हे विसरू नका, असे शिवसेनेने शहा यांच्याकडे स्पष्ट केले होते.