Join us

‘ती’ सेल्फी अखेरची ठरली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 02:58 IST

ईदनिमित्ताने मरिन ड्राइव्हवर घेतलेली सेल्फी चेंबूरच्या १३ वर्षीय अल्ताफ शेखसाठी अखेरची ठरली. मरिन ड्राइव्ह येथे सेल्फीच्या नादात तो समुद्रात बुडाला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मुंबई : ईदनिमित्ताने मरिन ड्राइव्हवर घेतलेली सेल्फी चेंबूरच्या १३ वर्षीय अल्ताफ शेखसाठी अखेरची ठरली. मरिन ड्राइव्ह येथे सेल्फीच्या नादात तो समुद्रात बुडाला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.चेंबूर येथील रहिवासी असलेला शेख हा पूर्वी कर्नाक बंदर येथे राहायचा. त्यामुळे त्याचे नेहमीच मरिन ड्राइव्ह येथे येणे असायचे. त्याला येथील परिस्थितीबाबत माहिती होती. शनिवारी दुपारी ईदनिमित्ताने त्याने मित्रासोबत मरिन ड्राइव्हवर फिरायला जाण्याचा बेत आखला. ठरल्याप्रमाणे त्याने मरिन ड्राइव्ह गाठले. शनिवारी सुट्टी असल्याने मरिन ड्राइव्ह ते गिरगाव चौपाटीपर्यंत तब्बल एक लाखाहून अधिक पर्यटक जमले होते. येथील कठड्यांखालील काँक्रिटच्या दगडावरून सेल्फी घेण्यासाठी अल्ताफ मित्रासोबत खाली उतरला. सेल्फी घेत असतानाच, त्याचा पाय घसरला आणि तो समुद्रात पडला. पोहता येत नसल्याने तो बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी पर्यटकांमधील एक तरुण खाली उतरला. मात्र, तोही जखमी झाला. या तरुणाला पोलीस, पर्यटकांनी समुद्रातून बाहेर काढले.२० मिनिटांनंतर अल्ताफला बाहेर काढले, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्याला जीटी रुग्णालयात नेण्यात आले. या दुर्घटनेबाबत त्याच्या कुटुंबीयांना समजताच त्यांना धक्का बसला. ऐन सणासुदीच्या काळात त्यांच्या घरात शोकाचे वातावरण पसरले.