Join us

पीपीई किटमधील ‘ती’ व्यक्ती सचिन वाझेच ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:06 IST

‘एनआयए’ला संशय; चालावयास लावून करणार शहानिशालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात सापडलेल्या जिलेटिन ...

‘एनआयए’ला संशय; चालावयास लावून करणार शहानिशा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात सापडलेल्या जिलेटिन असलेल्या स्काॅर्पिओची पीपीई किट घालून पाहणी करणारी व्यक्ती ही पोलीस अधिकारी सचिन वाझेच असल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱ्याचा कयास आहे. त्यांना त्या वेषात चालावयास लावून चालीची शहानिशा केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अंबानी यांच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये २४ फेब्रुवारीला मध्यरात्री या कटात सहभागी असलेली पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार परिसरात फेऱ्या मारताना दिसली. त्यामधून ड्रायव्हर बाहेर येऊन स्काॅर्पिओची पाहणी करतो. मात्र, त्याने ओळख लपवण्यासाठी पीपीई किट घातले होते. ही व्यक्ती सचिन वाझेच आहे का, हे तपासण्यासाठी एनआयएचे अधिकारी सचिन वाझे यांना पीपीई किट परिधान करून चालायला लावणार आहेत. त्यांच्या हालचालींवरून तसेच तांत्रिक बाबी आणि सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करून त्याबद्दल अंतिम निष्कर्ष काढला जाईल.

* जे. जे. रुग्णालयात पाच तास तपासणी

अटकेत असलेल्या वाझे यांची प्रकृती सातत्याने खालावत आहे. रविवारी मध्यरात्री तब्येत बिघडल्याने रात्री डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली हाेती. त्यानंतर साेमवारी दुपारी बाराच्या सुमारास त्यांना अधिकाऱ्यांनी जे. जे. रुग्णालयात नेले. येथे दुपारी ५ तास त्यांच्या सर्व वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यांना मधुमेह व रक्तदाबाचा त्रास होत असल्याचे सांगण्यात आले.

..........................