नवी मुंबई : ऐरोली विभाग कार्यालयामध्ये झालेल्या ओल्या पार्टी प्रकरणी विभाग अधिकाऱ्यांकडे अहवाल मागविण्यात आला आहे. सदर प्रकारावर पडदा टाकण्याचाही प्रयत्न सुरू झाला आहे. महापालिकेच्या ऐरोली विभाग कार्यालयामध्ये शुक्रवारी रात्री पार्टीचे आयोजन केले होते. या ठिकाणी मटण शिजविण्यात येत होते. दारूही मागविण्यात आली होती. दक्ष नागरिकांनी याविषयी लोकमतला माहिती दिली व सदर ठिकाणी जाऊन व्हिडीओ चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे तेथे पार्टी करणाऱ्यांची पळापळ सुरू झाली. कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा बंद करून बाहेर पळ काढला. या सर्व गोष्टींचे व्हिडीओ चित्रीकरण करून छायाचित्रे घेण्यात आली आहेत. याविषयी लोकमतने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर खळबळ उडाली आहे. या ठिकाणच्या काही कर्मचा-यांनी असा काही प्रकार घडलाच नाही असे सांगण्यास सुरुवात केली आहे. ऐरोली विभाग कार्यालयामध्ये पार्टी झालीच नाही असे सांगण्याचा प्रयत्न सुरू केला होता. परंतु याविषयी चित्रीकरण केल्याचे सांगताच काहींनी बाहेरून जेवण मागविले होते असे सांगण्यास सुरुवात केली आहे. या प्रकाराविषयी वारंवार प्रयत्न करूनही विभाग अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली आहे. विभाग अधिकाऱ्यांकडे याविषयी अहवाल मागविण्यात आला असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
ओल्या पार्टीप्रकरणी अहवाल मागविला
By admin | Updated: August 13, 2014 01:52 IST