चिकणघर : २७ गावांना पुन्हा कल्याण-डोंबिवलीतून वगळल्याची शासनाने सोमवारी प्राथमिक अधिसूचना जाहीर करून २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिकेचा मार्ग मोकळा केला. यामुळे २७ गावांचा मनपात समावेश की स्वतंत्र पालिका यास पूर्णविराम मिळाला.ही सूचना जाहीर झाल्याची खबर २७ गावांत येताच फटाके फोडून नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले. यासंदर्भात सर्वप्रथम ‘लोकमत’ने शनिवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनीच ही माहिती दिली होती.१९८३ साली मनपात समावेश झालेल्या या गावांना ग्रामस्थांच्या विरोधामुळे २००२ मध्ये वगळून २००५ मध्ये पुन्हा ग्रामपंचायती स्थापण्यात आल्या. मात्र सप्टेंबर २००३ मध्ये एमएमआरडीए आणि १ जून २०१५ पासून कडोंमपामध्ये समावेश झाल्यानंतरही ग्रामस्थांचा विरोध पाहता शासनाने सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान २७ गावे कडोंमपातून वगळल्याची अधिसूचना जाहीर करून त्यांच्या स्वतंत्र पालिकेचा मार्ग मोकळा केला.२७ गावे सर्वपक्षीय संरक्षण हक्क समितीने या निर्णयाचे स्वागत केले. आ. नरेंद्र पवार यांच्या प्रयत्नाने हे घडून आल्याचे सांगण्यात आले. राजकीय पक्षांकडून २७ गावांबाबतच्या धरसोड निर्णयामुळे गावांत मात्र विकास ठप्पच झालेला आहे. दरम्यान, ग्रामस्थांमध्ये या निर्णयाचे जोरदार स्वागत झाले आहे.
‘ती’ २७ गावे कल्याण-डोंबिवलीतून वगळली
By admin | Updated: September 8, 2015 05:28 IST