Join us

‘साठ्ये’च्या प्राचार्यांवर गुन्हा दाखल होणार?

By admin | Updated: February 21, 2015 03:17 IST

मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अनधिकृतपणे शुल्क वसूल केल्याप्रकरणी साठ्ये महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर गुन्हा दाखल करावा,

मुंबई : मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अनधिकृतपणे शुल्क वसूल केल्याप्रकरणी साठ्ये महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर गुन्हा दाखल करावा, असे पत्र मुंबई उपनगर समाजकल्याण विभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले आहे. त्यामुळे प्राचार्यांवर लवकरच गुन्हा दाखल होणार आहे.साठ्ये महाविद्यालयाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश देतेवेळी त्यांच्याकडून नियमबाह्य शुल्क घेतल्याचा ठपका विद्यापीठाने गठीत केलेल्या समितीने महाविद्यालयावर ठेवला आहे. त्यानुसार मनविसेचे मुंबई विद्यापीठ सरचिटणीस संतोष धोत्रे यांनी समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे महाविद्यालयावर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार मुंबई उपनगर समाजकल्याण विभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी महाविद्यालयाची चौकशी केली असता महाविद्यालयाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अधिक शुल्क घेतल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार साहाय्यक आयुक्तांनी उच्चशिक्षण विभागाच्या संचालकांकडे महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याची शिफारस केली आहे. समाजकल्याण विभागाच्या साहाय्यक आयुक्तांकडून प्राचार्यांवर गुन्हा दाखल करण्यात येत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी चेंबूर येथील समाजकल्याण विभाग कार्यालयात आंदोलन केले. त्यानंतर समाजकल्याण विभागाने महाविद्यालयाच्या प्राचार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली. (प्रतिनिधी)समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये जाऊन प्राचार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र दिले आहे. शासनाच्या अध्यादेशानुसार महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे या पत्रात नमूद केले आहे. तसेच याबाबतचे पुरावेही समाजकल्याण अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याला दिले आहेत.