मुंबई : विद्यार्थ्यांच्या संगीत गुणांना वाव देण्यासाठी सायन येथील शिव शिक्षण संस्था संचलित डी.एस. हायस्कूलमध्ये शंकर महादेवन संगीत अकादमी सुरू करण्यात येणार आहे. या अकादमीत संगीताची आवड जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. २२ सप्टेंबरला अकादमीच्या उद्घाटनप्रसंगी शंकर महादेवन हे विद्यार्थ्यांसाठी खास सादरीकरण करणार आहेत. संगीत अकादमीबाबत अधिक माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी सांगितले की, शालेय अभ्यासक्रमात संगीत हा विषय शिकविला जातो. मात्र त्याची व्याप्ती वाढविणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांना आवाहन केले असता त्यांनी शाळेतच अकादमीची शाखा सुरू करण्याची तयारी दर्शवली. शिवाय उद्घाटन प्रसंगी ते स्वत: उपस्थित राहून संगीतविषयक प्रवासरुपी सादरीकरण करणार आहेत.येथे इयत्ता पहिली ते दहावीतील सुमारे ३ हजार ५०० मुलांना संगीताचे धडे देण्यात येणार आहे. त्यातील निवडक १०० विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत अथवा त्यांना ज्या वाद्यकलेत भविष्य घडवायचे आहे, त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रधान यांनी सांगितले.डी.एस.हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना गायन, तसेच विविध प्रकारच्या वाद्यांचे शास्त्रीय मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या संदर्भातील सर्व खर्च शिव शिक्षण संस्था करणार असल्याचेही प्रधान यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)
सायनमध्ये शंकर महादेवन संगीत अकादमी
By admin | Updated: September 17, 2016 02:41 IST