Join us

अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:06 IST

चाचपणी सुरू; जुलैमध्ये शाळा स्तरावर ऑफलाइन पद्धतीने स्वतंत्र प्रवेश परीक्षेची शक्यतालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी प्रवेशासाठी सामायिक ...

चाचपणी सुरू; जुलैमध्ये शाळा स्तरावर ऑफलाइन पद्धतीने स्वतंत्र प्रवेश परीक्षेची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात यावी का, अशी चाचपणी सद्यस्थितीत शिक्षण विभागाकडून होत आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण सुरू असून, विद्यार्थ्यांना ९ मेपर्यंत गुगल फॉर्म भरून आपली मते आणि प्रतिक्रिया विभागाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सीबीएसई मंडळ किंवा राज्य शिक्षण मंडळ दहावीचे निकाल कोणत्याही पद्धतीने जाहीर करत असले तरी अकरावीचे प्रवेश मात्र एकसमान पातळीवर आणि गुणवत्तेच्या आधारे व्हावेत, असे मत शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण तज्ज्ञांचे आहे. या पार्श्वभूमीवर सर्व मंडळाची अकरावी प्रवेशासाठी गुणात्मक तुलना करणे सोपे होईल, या दृष्टीने या सामायिक चाचणीसंदर्भात विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती

एन

सीईआरटी

संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.

दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असल्या तरी अंतर्गत मूल्यमापनाचा कोणताच धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. अकरावीत प्रवेश घेत असताना विद्यार्थी विज्ञान, कला, वाणिज्य, आयटीआय किंवा इतर अभ्यासक्रमांची निवड करत असतात. त्यामुळे प्रवेश हे गुणवत्ता यादीच्या माध्यमातून करण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. कोणत्याही मंडळाचे विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव होऊ नये, यासाठी अकरावीसाठी थेट सामायिक स्वतंत्र परीक्षेचा पर्याय बैठकांमधून पुढे आला आहे. ही सीईटी परीक्षा राज्यातील सर्व इच्छुक विद्यार्थी देऊ शकतील. ओएमआर पद्धतीनुसार, सर्व विषयांची मिळून एक प्रश्नपत्रिका तयार केली जाईल, त्यामध्ये सर्वसमावेशक सामान्यज्ञानाचे प्रश्न असतील, असे या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप असणार आहे. या परीक्षेसाठी २ तासांचा वेळ देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले असून, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर किंवा जुलै महिन्यात शाळा स्तरावर ही परीक्षा घेण्याचा विचार सुरू असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

दरम्यान, अकरावीसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतली तर काही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. शिवाय या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयारीसाठीही वेळ लागणार असल्याने त्यांची तशी तयारी आवश्यक असल्याचे मत काही मुख्याध्यापकांनी व्यक्त केले.

* विद्यार्थ्यांची मते जाणून घेणार

राज्यातील अकरावी प्रवेशाेच्छुक विद्यार्थ्यांसाठी १०० गुणांची ऑफलाइन प्रवेश चाचणी प्रस्तावित असून, या चाचणीच्या आधारावर त्यांना अकरावीत प्रवेश देण्याचे विचाराधीन आहे. विद्यार्थ्यांची मते जाणून घेतल्यानंतरच हा निर्णय अंतिम होऊ शकेल आणि पुढील कार्यवाहीसाठी विचार केला जाईल.

- दिनकर टेमकर, संचालक ,

एन

सीईआरटी

* शिक्षणतज्ज्ञांचा विरोध

अशी सर्वेक्षणे किती लोकांपर्यंत जातात, कोणाच्या मताच्या बाजूने जास्त सर्वेक्षण होते, यावर अशा सर्वेक्षणाचा निकाल अवलंबून असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी ऑनलाइन सर्वेक्षणाच्या माध्यमातील निकालावर अवलंबून राहून खेळणे चुकीचे असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. शिवाय जे दहावीचे विद्यार्थी ऑनलाइन नाहीत, ते या प्रक्रियेतही प्रवाहाबाहेरच राहणार असल्याने हे सर्वेक्षण पूर्णपणे विद्यार्थी केंद्रित नसेल असे मत व्यक्त होत आहे.

........................