Join us  

पर्रिकरांबाबत शरद पवारांचे वक्तव्य अयोग्यच, मुख्यमंत्र्यांनी केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 3:42 PM

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी भाष्य करत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद पवारांनी केलेलं विधान अयोग्य आहेच अशी टीका केली आहे. 

मुंबई - राफेल खरेदीचा व्यवहार माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना अमान्य होता त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. यावर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी भाष्य करत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद पवारांनी केलेलं विधान अयोग्य आहेच अशी टीका केली आहे. 

पत्रकारांशी राफेलवरुन शरद पवारांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले की, शरद पवारांनी हे विधान करण्याची गरज नव्हती. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर असं वक्तव्य करणं अयोग्य आहे. मनोहर पर्रिकर असते तर याचं उत्तर दिलं असतं. मात्र राहुल गांधी यांनीही याआधी असेच काहीसे बोलण्याचा प्रयत्न केला होता. मृत्यूच्या 8 दिवस आधी मनोहर पर्रिकर बोलले होते. जर मला संधी मिळाली तर मोदींसाठी किमान 2 प्रचारसभा तरी घेईन कारण असा पंतप्रधान देशाला परत मिळणार नाही

कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राफेल करारावरून केंद्र सरकारवर टीका केली होती. यावेळी राफेल खरेदी व्यावहारात गैरप्रकाराची तक्रार झाली. विमानांच्या किंमती तीन वेळा बदलण्यात आल्या. हा सर्व व्यवहार तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना पटला नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि गोव्याचे मुख्यमंत्री होणे पसंत केले, असे शरद पवार म्हणाले होते.

लोकसभा निवडणुकीनंतर राफेलसारख्या घोटाळ्यांची चौकशी होईल. मोदींनी प्रक्रियाच नष्ट केली. कारवाई तर होणारच. घोटाळा कुणी केला हे पर्रिकर यांना माहीत होते असं काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आरोप केला होता.

टॅग्स :लोकसभा निवडणूकशरद पवारदेवेंद्र फडणवीसमनोहर पर्रीकरराफेल डील