Join us  

साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष म्हणणाऱ्या फडणवीसांना शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2023 12:48 PM

राष्ट्रवादी अध्यक्षपदाच्या राजीनामा घडामोडीनंतर शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले होते

मुंबई/सोलापूर - कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी १० मे रोजी मतदान होत आहे. त्यासाठीचा, निवडणूक प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. भाजप, काँग्रेस आणि अन्य पक्षांचे बडे नेते कर्नाटकात जोरदार प्रचार करत आहेत. महाराष्ट्रातील अनेक नेते कर्नाटकात जाऊन प्रचार करत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकात प्रचारसभेला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली . राष्ट्रवादी हा महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे, कर्नाटकात काय डोंबलं करणार?, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला. त्यावर, आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय.  

राष्ट्रवादी अध्यक्षपदाच्या राजीनामा घडामोडीनंतर शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात विविध ठिकाणी गाठीभेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेलाही पवारांनी प्रत्युत्तर दिलं. ''आता मी चाललोय निपाणीला, त्यामुळे कोण पार्सल आहे, आणि कोण किती वस्ताद आहे, ह्या सगळ्या खोलात तिथं बोलायचं, इथ नाही,'' असे म्हणत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना निपाणीत जाऊनच उत्तर देऊ, असं स्पष्ट केलं. फडणवीसांच्या टीकेवर एका वाक्यात पवार यांनी भूमिका मांडली. त्यामुळे, आता निपाणीत गेल्यावर शरद पवार काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, कर्नाटकातील निपाणी येथील भाजप उमेदवार शशिकला जोल्ले यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीसांनी सभा घेतली होती, त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर बोचरी टीका केली.

फडणवीसांनी काय केली टीका

सीमाभागातील निपाणीमध्ये जाहीर सभेत बोलताना फडणवीस म्हणाले की, इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे. मात्र, हा राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय डोंबलं करणार? इथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मिलगीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचे काय करायचे बघतो. काँग्रेसला आता राहिलेच नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.  

टॅग्स :शरद पवारदेवेंद्र फडणवीसकर्नाटकनिवडणूक