Join us  

राणेंनी काँग्रेसमध्ये जाणं चूक होती की घोडचूक? हे मी बोलणार नाही- पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 9:30 PM

नारायण यांना शिवसेना सोडावी लागली. अन्याय सहन करायचा नाही, असं ठरवूनच त्यांनी शिवसेना सोडली.

मुंबईः नारायण यांना शिवसेना सोडावी लागली. अन्याय सहन करायचा नाही, असं ठरवूनच त्यांनी शिवसेना सोडली. त्यानंतर त्यांच्यासमोर काँग्रेस की राष्ट्रवादी असे दोन पर्याय होते. राणेंनी काँग्रेसमध्ये जाणं चूक होती की घोडचूक? हे मी आता बोलणार नाही. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आत्मकथनपर पुस्तकाचे आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी शरद पवार बोलत होते.शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यापैकी कोणत्या पक्षात जावं? असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. मग त्यांनी दोन चिठ्ठ्या बनवल्या आणि त्यातली एक चिठ्ठी उचलली, ती काँग्रेसची होती. काँग्रेसमध्ये जाणं चूक होती की घोडचूक? यासंदर्भात मी काही बोलणार नसल्याचंही पवारांनी सांगितलं आहे. काँग्रेसमध्ये आल्यावर मी त्यांचं स्वागत केलं. काँग्रेसमध्ये आल्या आल्या 4 ते 5 महिन्यात काही घडेल, अशी अपेक्षा न करण्याचा सल्ला मी राणेंना त्यावेळीच दिला होताच. तुम्ही नवीन आहात, आमचं आयुष्यच काँग्रेसमध्ये गेल्याची आठवणही मी त्यांना करून दिली होती. शरद पवार बोलत असताना त्या ठिकाणी नितीन गडकरीही उपस्थित होते.  

 यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नारायण राणेंवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. नारायण राणेंनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी आमच्यात थोडीफार धुसफूस झाली. शिवसेना सोडू नका, असं मी राणेंना समजावलं होतं. त्यावेळी राणेंच्या डोळ्यातही अश्रू आले होते, तसेच मी हा निर्णय आनंदानं घेत नसल्याचं त्यांनी मला सांगितलं, याचीही आठवण नितीन गडकरींनी करून दिली. राणेंकडे चांगलं व्यवस्थापन कौशल्य होते. त्यावेळी नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसता तर आज महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते’, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. बाळासाहेबांचा स्वभाव परखड होता. पण बाळासाहेबांचंसुद्धा राणेंवर अपार प्रेम होतं. काळानुरूप राजकारणात अनेक बदल होत गेले असून, बदलत्या परिस्थितीनुसार राजकारण्यांना बदलावं लागलं. नारायण राणे कधी परिस्थितीसमोर हतबल झालेले नाहीत. महाराष्ट्र आणि मराठी माणसावर राणेंनी भरपूर प्रेम केले. तसेच राणेंच्या या पुस्तकात त्यांचा फक्त 25 टक्के इतिहास दिलेला आहे. राणेंच्या भूतकाळातील 75 टक्के इतिहास हा पुस्तकात छापण्यात आलेला नाही. 2001 ते 2009 या काळातील त्यांच्या जीवनातील घडामोडी मी जवळून पाहिलेल्या आहेत’, याची आठवणही गडकरींनी करून दिली आहे.

टॅग्स :नारायण राणे नितीन गडकरी