Join us  

विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी पवार'नीती पुन्हा सक्रीय; प्रमुख नेत्यांना लावले फोन 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 5:08 PM

जर प्रत्यक्ष निकालात चित्र पालटलं तर विरोधी पक्षांना एकत्रित करून सत्ता स्थापन करण्याचा पवारांचा प्रयत्न आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालांना अवघे काही तास शिल्लक आहेत. एक्झिट पोलनुसार एनडीएला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तविला जात असला तरी प्रत्यक्ष निकाल वेगळे लागतील असा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. एनडीएकडून सर्व पक्षातील नेत्यांना डिनरसाठी बोलवून घटकपक्षांना जवळ करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. अशातच जे पक्ष एनडीएसोबत निकालानंतर जाऊ शकतात अशा लोकांना संपर्क करण्याचं काम विरोधी पक्षातील नेते करत आहेत. 

एका हिंदी वृत्तवाहिनीच्या दाव्यानुसार शरद पवार यांनी वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी, तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते चंद्रशेखर राव, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी संपर्क साधला आहे. जर प्रत्यक्ष निकालात चित्र पालटलं तर विरोधी पक्षांना एकत्रित करून सत्ता स्थापन करण्याचा पवारांचा प्रयत्न आहे. सूत्रांनुसार नवीन पटनायक आणि केसीआर यांनी समर्थन करण्याचं आश्वासन दिलं आहे. 

शरद पवारचंद्राबाबू नायडू यांच्याही संपर्कात आहेत. शरद पवार यांच्याशिवाय चंद्राबाबू नायडूदेखील विरोधी पक्षांना एकत्र करण्याच्या हालचाली करत आहेत. नायडू यांनी ममता बॅनर्जी, मायावती, अखिलेश यादव, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, जेडीएस नेते कुमारस्वामी आणि देवेगौडा यांची भेट घेतली आहे. 

चंद्राबाबू नायडू यांचे कट्टरविरोधक जगन रेड्डी यांच्याशी पवारांचं बोलणं झालं नाही. शरद पवार यांनी त्यांच्याशी संपर्क साधला मात्र ते बाहेर असल्याचं कळालं. नवीन पटनायक यांच्या सूत्रांकडून पटनायक यांनी काँग्रेस नेते कमलनाथ यांचाही फोन आला होता. नवीन पटनायक यांनी एनडीए अथवा यूपीए यांच्यापैकी कोणासोबत जाणार ही भूमिका अद्याप घेतली नाही. 

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी एक्झिट पोलवर भाष्य करताना काही वृत्तवाहिन्या सत्ताधारी पक्षाच्या हातातील 'कठपुतली बाहुल्या' बनल्या आहेत. अनेक लोकांनी फोन करून माझ्याकडे याबाबत चिंता व्यक्त केली. मात्र चिंता करण्याचे कारण नाही. येत्या काही दिवसांतच चित्र स्पष्ट होणार आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.    

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०१९शरद पवारचंद्राबाबू नायडू