Join us  

मोदींना भेटण्याबाबतची माहिती शरद पवारांनीच मुख्यमंत्र्यांना दिली होती

By अतुल कुलकर्णी | Published: July 18, 2021 10:42 AM

आता सोबत जाण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात स्पर्धा सुरू झाल्याची चर्चा काही प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झाल्याबाबत पवारांनी दिल्लीत आश्चर्य व नाराजी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दोन दिवसांपूर्वी झालेल्या भेटीदरम्यान आपण पंतप्रधानांची वेळ मागितली होती. त्यांनी आपल्याला शनिवारची वेळ दिली असून, भेटीत सहकारी वित्तीय संस्थांबाबत केलेले बदल आणि अन्य विषयांवर चर्चा करणार आहे. आपल्या राज्याचे काही महत्त्वाचे विषय मी त्यांना सांगणार आहे. आपल्याला काही विषय सुचवायचे तर सांगा, अशी चर्चा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबत केली होती. जेव्हा भाजप आम्हाला आग्रह करत होती, तेव्हा आम्ही भाजपसोबत गेलो नाही. आता सोबत जाण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात स्पर्धा सुरू झाल्याची चर्चा काही प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झाल्याबाबत पवारांनी दिल्लीत आश्चर्य व नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांची वर्षा निवासस्थानी भेट झाल्यानंतर स्वतः पवार यांनीच या भेटीबद्दल मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली होती. आपण कोणते मुद्दे मांडणार आहोत आणि तुम्हाला कोणते मुद्दे आणखी अपेक्षित आहेत, याचीही विचारणा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतरच पवार यांनी सविस्तर निवेदन तयार करून पंतप्रधानांना दिले, अशी माहिती एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे. दरम्यान, पवार-मोदी भेटीनंतर भरदिवसा सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या भाजप नेत्यांचा मात्र सायंकाळपर्यंत स्वप्नभंग झाला. काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, विधिमंडळातील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळीदेखील पवार यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार असल्याची कल्पना दिली होती.

दरम्यान दिवसभराच्या चर्चेबाबत बोलताना मंत्री नवाब मलिक यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, सत्तेचे गाजर दाखवून ज्या आमदारांना भाजपने स्वतःकडे थोपवून धरले आहे, त्यांच्यातील चलबिचल कमी करण्यासाठी भाजपचे काही नेते जाणीवपूर्वक अशी चर्चा करत आहेत. सरकार अस्थिर असल्याच्या वावड्या उठवत आहेत. मात्र त्याला काहीही अर्थ नाही.

मोदी-पवार भेटीनंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत येणार, अशा बातम्या सुरू झाल्या. तेव्हा दिल्लीत पवार यांनी या बातम्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मुख्य प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांना पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती सांगायला सांगितली. - नवाब मलिक, मुख्य प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस 

टॅग्स :राजकारणउद्धव ठाकरे