Join us

सह्याद्रीवर शरद पवार "अतिथी", मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीमुळे चर्चेला उधाण

By admin | Updated: May 24, 2017 11:12 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून यामागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मंगळवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये ही बैठक पार पडली.
 
शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये तब्बल एक तासभर चर्चा सुरु होती. तासभर झालेल्या या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्दयांवर चर्चा झाली हे अजून गुलदस्त्यात आहे. शरद पवारांची भेट पुर्वनियोजीत होती का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र त्यांच्या या अचानक भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
 
दुसरीकडे मुख्यमंत्री कार्यालयानं कॅगच्या अहवालानंतर लवासाचा विशेष नियोजन प्राधिकरण दर्जा रद्द केला असल्याने भेट घेण्यामागे हे एक कारण असू शकतं असं बोललं जात आहे. 
 
- ‘लवासा’वर आता शासनाचे नियंत्रण
 

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या कल्पनेतून आकाराला आलेला ‘लवासा’ प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) वर्ग करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. जीएसटीच्या निमित्ताने सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांनी केलेली भाषणे विरली नाहीत तोच हा निर्णय सरकारने घेतला.

लवासावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष नियोजन प्राधिकरणानेच मनमानी कारभार केल्याने हा प्रकल्प अडचणीत आल्याचा ठपका लोकलेखा समितीने ठेवला होता. या प्रकल्पावर सरकारचे नियंत्रण आणण्यासाठी ‘पीएमआरडीए’चे आयुक्त किंवा तत्सम अधिकारी, पुणे जिल्हाधिकारी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे नगररचना संचालक आदींचा समावेश करावा, अशी शिफारसही समितीने केली होती. सरकारने ही शिफारस मान्य केली, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या निर्णयामुळे आता लवासामधून मिळणारा विकास निधी, अतिरिक्त एफएसआयसाठी दिला जाणारा प्रिमियम शासनाला मिळेल. शिवाय, या भागात झालेली बेकायदा बांधकामे तपासण्याचा आणि प्रसंगी ती पाडण्याचाही अधिकार या प्राधिकरणाला मिळणार आहे.

लवासा कापोर्रेशन लि. या आस्थापनाद्वारे पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि वेल्हे या तालुक्यांतील १८ गावांच्या परिसरात ५ टप्प्यांत लवासा प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प शरद पवार यांच्या पुढाकाराने सुरु झाला होता. मात्र प्रारंभापासून याला विरोध होत आला. अनेक बेकायदेशीर कृत्ये करून पश्चिम घाटासारख्या नाजुक पर्यावरणाची कायमस्वरुपी हानी व सह्याद्रीची चाळण करून टाकणाऱ्या लवासा कंपनीच्या स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीची पुनर्रचना नव्हे तर ती रद्दच केली पाहिजे, अशी यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनाची मागणी होती.