Join us  

Sharad Pawar : केंद्र सरकार महाराष्ट्रासोबत, शरद पवारांचं दिल्लीकरांशी झालं बोलणं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 1:37 PM

Sharad Pawar : कोरोनाची राज्यातील गंभीर व भयावह स्थिती लक्षात घेता या स्थितीला धैर्याने... सामूहिकपणाने आपण सामोरे गेलेच पाहिजे आता त्याला पर्याय राहिलेला नाही.

ठळक मुद्देकोरोनाची राज्यातील गंभीर व भयावह स्थिती लक्षात घेता या स्थितीला धैर्याने... सामूहिकपणाने आपण सामोरे गेलेच पाहिजे आता त्याला पर्याय राहिलेला नाही.

मुंबई - राज्यात पुढील 3 दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होतं. तसेच, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्रासाठी आठवड्याला 40 लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली. त्यानंतर, लसीकरणाच्या मुद्द्यावरुन केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने आले आहेत. डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विटरवरुन परिपत्रक शेअर करत महाराष्ट्र सरकारला लक्ष्य केले. मात्र, केंद्र सरकार आणि आरोग्य खाते संपूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या पाठिशी असल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांच्याशी बोलताना म्हटले.  

कोरोनाची राज्यातील गंभीर व भयावह स्थिती लक्षात घेता या स्थितीला धैर्याने... सामूहिकपणाने आपण सामोरे गेलेच पाहिजे आता त्याला पर्याय राहिलेला नाही. समाजातील सर्व घटकांना, कष्टकरी, शेतकरी, व्यापारी व अन्य घटकांना विनंती आहे की, आपणाला वास्तव नाकारुन चालणार नाही. जनतेच्या जिवितासाठी, सुरक्षिततेसाठी राज्यसरकारला अपरिहार्य निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असे कळकळीचे आवाहन शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेला आज केले. 

राज्य सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करतेय त्याचप्रमाणे केंद्रसुध्दा या संकटातून राज्याला मदत करण्यासाठी पूर्णपणे सहकार्याची भूमिका घेत आहे असे सांगतानाच कालच देशाच्या आरोग्य मंत्र्यांशी संपर्क साधला. ज्या कमतरता आहे याबाबत चर्चा केली. त्यांनी या सर्व संकटात केंद्रसरकार व आरोग्य खातं पूर्ण शक्तीने सर्व राज्यांच्या पाठीशी आहे. महाराष्ट्रातील सरकारच्याही पाठिशी आहे. त्यामुळे त्यांची मदत व आपल्या सर्वांचा सामूहिक प्रयत्न यातून मार्ग काढायचा आहे असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. 

चंद्रकांत पाटलांची टीका

महाराष्ट्राला वेळेत पुरवठा न झाल्यास तीन दिवसांत लसीकरण बंद पडण्याची भीती टोपे यांनी व्यक्त केली. त्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारमुळे अख्ख्या देशाच्या कोरोनाविरोधी लढ्याला फटका बसल्याचं सांगत ठाकरे सरकावर जोरदार टीका केली. डॉ. हर्षवर्धन यांच्या टीकेनंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राज्य सरकारवर घणाघाती टीका केलीय. 

डॉ. हर्षवर्धन यांनी शेअर केलं परिपत्रक

महाराष्ट्रात लसीचा तुटवडा निर्माण झाल्याचं सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात 3 दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक असल्याचं म्हटलंय. त्यावर एकट्या महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या वृत्तीमुळे अख्ख्या देशाच्या कोरोनाविरोधातील लढ्याला फटका बसल्याची टीका डॉ. हर्षवर्धन यांनी केलीय. महाराष्ट्र सरकारकडून पुरेशा कार्यक्षमतेची कमतरता आता दिसू लागली आहे. त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागत आहेत, असंही डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलंय. डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक परिपत्रकच शेअर केलंय. 

चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला टोला 

लसीकरणाच्या मुद्यावरुन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्य सरकारला ठोक ठोक ठोकलंय, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यानी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केलीय. महाराष्ट्रात इंजेक्शनचा पत्ता नाही, लसीकरणासाठी तुमचा योग्य कारभार नाही. प्रत्येक विषयात जर तुम्ही केंद्राला दोष देणार असाल तर केंद्राकडे राज्य चालवायला द्या, असेही पाटील म्हणाले. 

डॉ. हर्षवर्धन यांच्यावर काँग्रेसचा पलटवार

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या टीकेवर महाराष्ट्र काँग्रेसनं पलटवार केला. महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन प्रत्युत्तर देण्यात आलंय. ‘शेवटी आज केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा तथा मोदी सरकारचा महाराष्ट्रद्रोही चेहरा समोर आलाच! अपेक्षेप्रमाणे आणि आजवरच्या कारकिर्दीप्रमाणे त्यांनी आपल्या नियोजनशून्य कारभाराचे खापर राज्यांच्या खासकरुन बिगर भाजपशासित राज्यांच्या माथी फोडायला सुरवात केली आहे’, असा पलटवार महाराष्ट्र काँग्रेसने केला आहे. (Allegations between the Center and the Maharashtra government over the shortage of corona vaccine) 

टॅग्स :शरद पवारडॉक्टरकेंद्र सरकारसरकार