शैलेश चव्हाण, तळोजाऐन शेतीचे पीक हातात येण्याच्या दिवसातच तळोजातील करवले गावातील भातशेती प्रदूषणाने धोक्यात आली आहे. एका कंपनीमधून सोडल्या गेलेल्या विषारी वायूमुळे या भागातील भातशेती अक्षरश: करपली असून शेतीपाठोपाठ नागरिकांचे आरोग्यही यामुळे धोक्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारही केलेली आहे.तळोजात एका कंपनीच्या वायू सोडणाऱ्या चिमणीचा वापर केला जात नसून कारखान्याच्या आवारातूनच हा धूर बाहेर येतो आणि हा धूर करवले आणि भोईरवाडा या खेडेगावांत वेगाने पसरतो. बुधवारी रात्रीही असा प्रकार घडला असून यावेळी ग्रामस्थांच्या शेतीवरच त्याचा परिणाम झाला आहे. १५ दिवसातील ही तिसरी घटना आहे. प्रदूषणाच्या कचाट्यात सापडलेल्या या ग्रामस्थांना मळमळ होणे, अंगाला खाज येणे, डोळ्यांची जळजळ आणि सर्वात धोकादायक म्हणजे वृध्द नागरिक आणि गरोदर महिलांच्या नवजात अर्भकांच्या आरोग्यावरही याचा परिणाम जाणवत असल्याचे करवले ग्रामस्थ सुनील पाटील यांनी माहिती देताना सांगितले. तळोजातील या घटनेनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली. प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी तानाजी यादव यांनी कंपनीतील बिघाड दुरुस्त होईपर्यंत कंपनी चालू न करण्याचे कंपनी व्यवस्थापनाला सांगितले आहेत. संबंधित कंपनीत वेस्ट मटेरियल बाहेरून आणले जाते. त्याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर रात्रीचा धूर हा स्मशानातील धुरापेक्षाही अधिक तीव्र असतो. वारंवार तक्रार, पत्रव्यवहार करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ लक्ष देत नसल्याचे यावेळी स्थानिक नागरिक सुनील पाटील यांनी सांगितले. ०
शेताला स्मशानाचे रूप
By admin | Updated: September 25, 2014 23:32 IST