Join us

शंकर नम यांच्या शिवबंधनाचा काँग्रेसवर परिणाम नाही?

By admin | Updated: September 8, 2014 00:38 IST

डहाणूचे माजी खासदार आणि माजी आमदार तसेच माजी उपमंत्री व काँग्रेसे नेते शंकर नम यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला तरी त्याचा फारसा परिणाम काँग्रेसवर होणार नाही अशीच चिन्हे आहेत.

पालघर : डहाणूचे माजी खासदार आणि माजी आमदार तसेच माजी उपमंत्री व काँग्रेसे नेते शंकर नम यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला तरी त्याचा फारसा परिणाम काँग्रेसवर होणार नाही अशीच चिन्हे आहेत. कारण गेल्या अनेक दिवसांपासून ते काँग्रेसमध्येही फारसे सक्रिय नव्हते. काँग्रेसने या जिल्ह्यात राजेंद्र गावित यांचे नेतृत्व प्रयत्नपूर्वक उदयाला आणण्याची खेळी खेळल्याने नम यांना तसा ‘चेक’ बसला होता. दोन आमदारक्या आणि दोन वर्षांसाठीची खासदारकी बरीच वर्षे ठाण्याचे पालकमंत्रीपद त्यांना लाभलेले असले तरी मंत्री अथवा नेता म्हणून त्यांचा कोणताही ठसा जिल्ह्यावर अथवा त्यांच्या मतदारसंघावर कधीच जाणवला नव्हता. आधी काँगेसमध्ये नंतर राष्ट्रवादीत नंतर पुन्हा काँग्रेसमध्ये व आता शिवसेनेमध्ये असा त्यांचा प्रवास राहिला आहे. म्हणजे एकापरिने त्यांनी पक्षांतराची बाऊंड्रीच पूर्ण केली आहे. काँग्रेसमध्ये गेले तरी तिथे त्यांना कोणतेही पद दिले गेले नव्हते त्यामुळे ते निराश्रीतच होते. त्यांचे जिल्ह्यात काय महत्व आहे हे २००९ च्या विधानसभा निवडणुकींनी दाखवून दिले आहे. कोणत्याच पक्षाने संधी न दिल्याने ते डहाणूत अपक्ष म्हणून लढले होते. आणि त्यांना तिथे पराभव पत्कारावा लागला होता. तो ही मार्क्सवाद्यांकडून! एकीकडे वाडा, विक्रमगड येथे भाजपचा जोर, पालघरमध्ये कॉंग्रेस, बोईसरमध्ये ब.वि.आ. तर डहाणून डाव्यांचा जोर. अशा कोंडीमध्ये सापडल्याने त्यांचा या प्रदेशातील प्रभाव ओसरत गेला. कोणत्याच पक्षात कुठलेच स्थान नाही त्यामुळे त्यांच्यावर वारंवार पक्ष बदलण्याची वेळ आली. काँग्रेसमध्ये असले तरी पालघरमध्ये पुन्हा राजेंद्र गावितांची चलती असणार आणि डहाणूत संधी मिळण्याची शक्यता नाही अशी अवस्था झाल्यानेच त्यांनी भगवा गंडा हाती बांधून घेतला आहे. तरी त्यांना तिथे उमेदवारी मिळण्याची शक्यता धुसरच आहे. त्यामुळे या परिसराच्या राजकारणात फारसा फरक पडण्याची चिन्हे दिसत नाहीत. (विशेष प्रतिनिधी)