Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाडूच्या बाप्पाची ‘आॅनलाइन’ स्वारी!

By admin | Updated: August 4, 2014 01:51 IST

इकोफ्रेंडली गणेशमूर्तींबद्दल अधिकाधिक जनजागृती व्हावी, याकरिता विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई : इकोफ्रेंडली गणेशमूर्तींबद्दल अधिकाधिक जनजागृती व्हावी, याकरिता विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. याच धर्तीवर आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने थेट संकेतस्थळावर शाडूच्या बाप्पाच्चा वितरकांची यादी जाहीर केल्यामुळे शाडूचा बाप्पा एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या वापरामुळे होणारे प्रदूषण लक्षात घेता प्रदूषण मंडळाने मोठ्या प्रमाणावर वितरकांची निवड केली. त्यांच्या माध्यमातून मूर्ती उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात शाडूची मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांची आणि वितरकांची एकत्रित बैठकही घेण्यात आली होती.महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाच्या www.mpcb.gov.in या संकेतस्थळावर ६७ वितरकांची यादी मंडळाने जाहीर केली आहे. मागील वर्षी गणेशोत्सवाच्या काही दिवसांपूर्वी लोकांनी मागणी करूनही अनेक ठिकाणी शाडूच्या मूर्ती पोहोचू शकल्या नाहीत. त्यामुळे शाडूच्या मूर्तींची कमतरता टाळण्यासाठी यंदा प्रदूषण मंडळाने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आदी ठिकाणांमधील वितरकांशी संपर्क साधला. त्याद्वारे या वर्षी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप पाहता, उंची आणि विविध प्रकारच्या वस्तूंद्वारे मूर्ती घडविण्यात येते. मात्र यातील काही माध्यमे विसर्जनाला अडथळा निर्माण करतात, त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचण्याची शक्यता टाळता येत नाही. यावरच उपाय म्हणून शाडूच्या वितरकांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी या उपक्रमाची मदत होणार आहे. (प्रतिनिधी)