मुंबई : आयटीआय परीक्षेतील नकारात्मक गुणपद्धत रद्द करा, या प्रमुख मागणीसाठी स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय) या संघटनेच्या नेतृत्वाखाली हजारो आयटीआय विद्यार्थ्यांनी गुरुवारी आझाद मैदानात मोर्चा काढला. नकारात्मक गुण पद्धतीमुळे आयटीआयच्या परीक्षेत सुमारे ८० टक्के विद्यार्थी नापास झाले होते. त्यामुळे ही पध्दत रद्द करण्याच्या मागणीसाठी एसएफआय संघटनेने आझाद मैदानात मोर्चा काढण्यात आला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांनी आझाद मैदान ते तंत्रशिक्षण संचालनालय कार्यालयापर्यंत मोर्चास सुरुवात केली. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करून मोर्चा आझाद मैदानातच थांबवला. या मोर्चात आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एसएफआयच्या शिष्टमंडळाने आयटीआयच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. आयटीआय विद्यार्थ्यांचे सुधारित निकाल लवकर लावण्यात येतील, असे आश्वासन परीक्षा विभागाचे प्रमुख पवार यांनी शिष्टमंडळाला दिले. एसएफआयच्या शिष्टमंडळात राज्य अध्यक्ष मोहन जाधव, मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉ. रवींद्र मदने, जिल्हा सचिव विमलेश राजभर आदींचा समावेश होता.(प्रतिनिधी)
आयटीआय विद्यार्थ्यांसाठी एसएफआयचा मोर्चा
By admin | Updated: December 19, 2014 01:20 IST