Join us

अल्पवयीन मुलीसह मुलावर लैंगिक अत्याचार, तीन दिवस खाडीत लपलेला आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 02:45 IST

शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून पोलिसांना चकवा देण्यासाठी एक नराधम तीन दिवस खाडीत लपून बसला होता. मात्र क्राइम ब्रांचने सतत ७२ तास त्याच्या मागावर राहत अखेर गुरुवारी त्याच्या मुसक्या आवळल्या.

गौरी टेंबकर-कलगुटकर मुंबई : शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून पोलिसांना चकवा देण्यासाठी एक नराधम तीन दिवस खाडीत लपून बसला होता. मात्र क्राइम ब्रांचने सतत ७२ तास त्याच्या मागावर राहत अखेर गुरुवारी त्याच्या मुसक्या आवळल्या. मुख्य म्हणजे अटक इसमाने वर्षभरापूर्वी याच परिसरात एका अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.सचिन हनुमंत राजय्या (२२) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. तो चारकोप व्हिलेजचा राहणारा आहे. पीडित मुलगी सीमा (नावात बदल) तिच्या साठ वर्षीय आजीसोबत चारकोपच्या सेक्टर दोनमध्ये राहते, तर तिचे आई-वडील हे गावी असतात. राजय्या याचे या मुलीच्या घरी येणे-जाणे होते. ११ मार्च रोजी राजय्याने सीमाला चारकोपच्या बाबाजीवाडी परिसरात असलेल्या एका खोलीत भेटण्यासाठी बोलावले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि याबाबत कुठेही वाच्यता न करण्याची धमकीदेखील दिली. या मुलीने घरी आल्यावर घडला प्रकार तिच्या आजीला सांगितला.त्यानंतर फोन करून याबाबत आईलादेखील कळवले. त्यानुसार आजीने चारकोप पोलीस ठाण्यात धाव घेत राजय्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत हा गुन्हा नोंद केला.याच पोलीस ठाण्यात त्याच्यावर एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल आहे. बोरीवली पोलीस ठाण्यात चोरी आणि घरफोड्या तर नवी मुंबई, ठाण्यातही त्याच्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.तो सराईत गुन्हेगार असून त्याच्या अटकेसाठी प्रचंड दबाव पोलिसांवर होता.>२४ तास खाडीत पाठशिवणीचा खेळचारकोप पोलिसांसह क्राइम ब्रांचचा कक्ष ११ देखील या फरार आरोपीचा शोध घेत होते. त्याच्या मोबाइल लोकेशनपासून खबºयांचे नेटवर्क कार्यरत करत राजय्याचा पाठलाग पोलिसांनी केला. मात्र पोलीस त्याच्या मागावर असल्याचे त्याला समजले. त्यामुळे त्यांना चकवा देण्यासाठी तो चक्क चारकोपच्या खाडीमध्ये जाऊन लपला. मात्र क्राइम ब्रांच कक्ष ११ चे प्रभारी चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तेकर, पोलीस हवालदार अविनाश शिंदे, भांबेड, पोलीस नाईक देसाई या पथकाने खाडी परिसरात सापळा रचला. जवळपास २४ तास हे पथक त्या खाडी परिसरात दबा धरून बसले होते आणि अखेर त्यांनी राजय्याचा गाशा गुंडाळला.राजय्याने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार आमचे पथक आरोपीच्या मागावर होते. त्याला पुढील चौकशीसाठी आम्ही चारकोप पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.- चिमाजी आढाव, प्रभारी, क्राइम ब्रांच युनिट ११