Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या प्रसूतिगृहात सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया प्लांट

By जयंत होवाळ | Updated: February 22, 2024 21:13 IST

पालिकेच्या रुग्णालयातील हा पहिलाच सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प ठरणार आहे.

मुंबई : महापालिकेच्या बोरिवली पूर्व येथील माता व बालक प्रसूतिगृहातील सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी प्लांट उभारण्यात येणार आहे. या प्लांटमध्ये दररोज २५ किलो लिटर पाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्याव्यतिरिक्तच्या कामासाठी वापरण्यात येणार आहे. पालिकेच्या रुग्णालयातील हा पहिलाच सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प ठरणार आहे.

मुंबईत पाण्याची मागणी आणि पुरवठा यात तफावत आहे. शिवाय गळती आणि चोरीमुळे रोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होते. पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी विविध पर्यायांची चाचपणी केली जात आहे. समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. मुंबईत पिण्याच्या पाण्याचा वापर उद्यानातील झाडे, गाड्या धुणे या कामांसाठीही केला जातो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची आणखी कमतरता जाणवते. यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे धरणातील पाणी साठा  कमी झाला आहे. त्यामुळे कदाचित मुंबईवर १० टक्के पाणी कपातीचे संकट ओढवू शकते. याबाबत अजून निर्णय झालेला नाही. त्यामुळे पाण्याचे अन्य स्रोत धुंडाळले जात आहेत .

या सगळ्या बाबी लक्षात घेता सांडपाण्याच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यासाठी वापरता  येईल का याही पर्यायाची चाचपाणी सुरु आहे. त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त अन्य कामासाठी करता येईल का यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्‍वभूमीवर बोरिवली पूर्व येथील माता व बालक प्रसूतिगृहात सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते प्रसूतिगृहात पिण्याव्यतिरिक्तच्या कामासाठी वापरण्यासाठी प्लांट उभारण्यात येणार आहे. यासाठी पालिकेकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून पात्र कंपनीला कंत्राट देण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबई