Join us

‘नववी नापास’चा शिक्का पुसणार

By admin | Updated: January 2, 2017 06:55 IST

इयत्ता नववीतील नापास होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी, जलदगतीने शिक्षण ही पद्धत राबविण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने शनिवारी घेतला

मुंबई : इयत्ता नववीतील नापास होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी, जलदगतीने शिक्षण ही पद्धत राबविण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने शनिवारी घेतला. येत्या तीन वर्षांत नापासांचे प्रमाण पाच टक्क्यांवर आणण्याचे आणि टप्प्याटप्प्याने ते आणखी कमी करण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागाने ठेवले आहे.सन २०१३-१४मध्ये नववीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ५४ हजार इतकी होती. २०१४-१५मध्ये ही संख्या २ लाख ४० हजारांवर आली आणि २०१५-१६मध्ये ती १ लाख ५४ हजार इतकी खाली आली. हे प्रमाण येत्या तीन वर्षांत निम्म्याहून कमी करण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठीच आता जलदगतीने शिक्षण ही पद्धत राबविली जाणार आहे. या पद्धतीअंतर्गत इयत्ता नववीत नापास होण्याची शक्यता असलेल्या विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. त्यांना पाठ्यपुस्तकातील विविध संकल्पना वेगळ्या पद्धतीने शिकविण्यासाठी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, शैक्षणिक व्हिडीओच्या माध्यमातून समजविण्यात येतील. त्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांची मदत घेतली जाईल. इंग्रजी, विज्ञान आणि गणित हे विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले जाणार आहेत, याशिवाय वर्गखोल्याही डिजिटल करण्यास शाळांना सांगण्यात येईल.नववीतील नापास विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा नियमित निकालानंतर दोन महिन्यांच्या आत घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने आधीच घेतला आहे. (विशेष प्रतिनिधी)