Join us  

सात स्थानके नामांतराच्या प्रतीक्षेत!

By महेश चेमटे | Published: July 20, 2018 1:04 AM

दादरसह मुंबई सेंट्रलचाही समावेश; ब्रिटिशकालीन नावे बदलण्याची मागणी

मुंबई : तब्बल २७ वर्षांच्या प्रक्रियेनंतर बुधवारी रात्री १२ वाजता ‘एल्फिन्स्टन रोड’ स्थानकाचे नामकरण ‘प्रभादेवी’ असे करण्यात आले. एल्फिन्स्टन रोड स्थानकाच्या नावानंतर प्रस्तावित असलेल्या अन्य सात स्थानकांच्या नामांतराची मागणीही आता जोर धरू लागली आहे. प्रस्तावित स्थानकांत दादरसह मुंबई सेंट्रल स्थानकाचाही समावेश आहे.एल्फिन्स्टन रोड स्थानकानंतर दादर, मुंबई सेंट्रल, सँडहर्स्ट रोड, चर्नी रोड, करी रोड, कॉटनग्रीन आणि किंग्ज सर्कल या स्थानकांची नावे ब्रिटिश काळातील असल्याने नागरिकांसह राजकीय नेत्यांनी या स्थानकांच्या नावांना तीव्र विरोध केला आहे. यामुळे ‘दादर’ स्थानकाचे नाव ‘चैत्यभूमी’, ‘मुंबई सेंट्रल’ स्थानकाचे नाव ‘नाना शंकर शेठ’, ‘सँडहर्स्ट रोड’ स्थानकाचे नाव ‘डोंगरी’, ‘चर्नी रोड’ स्थानकाचे नाव ‘गिरगाव’, ‘करी रोड’ स्थानकाचे नाव ‘लालबाग’, ‘किंग्ज सर्कल’ स्थानकाचे नाव ‘पार्श्वनाथ’ तर कॉटनग्रीनचे नाव ‘घोडपेदव’ करण्याची मागणी जोर धरत आहे.ब्रिटिश काळात लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या नावावरून एल्फिन्स्टन रोड हे नाव स्थानकाला देण्यात आले होते. मुंबई महापालिकेत सध्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी १९९१ साली एल्फिन्स्टनचे नाव बदलण्याची मागणी केली होती. डिसेंबर २०१६मध्ये विधानसभेत सीएसएमटी आणि एल्फिन्स्टनच्या नामकरणाला मंजुरी मिळाली. यानंतर रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर जुलै २०१७मध्ये नामांतराचे परिपत्रक काढण्यात आले. त्यानंतर आता या स्थानकाचे नाव प्रभादेवी असे करण्यात आले आहे. 

टॅग्स :रेल्वेमुंबई