डिप्पी वांकाणी , मुंबई इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या स्पर्धेतील ‘कोलकाता नाईट रायडर्स’ या संघाची मालकी असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स स्पोर्टस प्रा. लि. कंपनीचे समभाग (शेअर्स) मॉरिशसच्या एका कंपनीला विकण्यासंदर्भात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अभिनेता शाहरूख खान याची मंगळवारी तीन तास चौकशी केली. शाहरूख खान हा कोलकाता या मालक कंपनीचा भागीदार आहे.२००९ साली झालेल्या व्यवहारात शेअर्सची किंमत कमी दाखवून ते अभिनेत्री जुही चावला हिचा पती जय मेहता याची मॉरिशसमधील कंपनी ‘सी आयलँड इन्व्हेस्टेमेंट’ला विकले होते. शाहरूख याला ईडीने आॅक्टोबरमध्ये बोलावले होते. यापूर्वी २०११ मध्येही त्याची ईडीने चौकशी केली होती. सध्या सुरू असलेल्या चौकशीत शाहरुखने शेअर्सच्या विक्रीशी संबंधित काही दस्तऐवजही दिले, असे ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हे प्रकरण २००८-०९मधील असून हे शेअर्स विकले गेले त्यावेळी त्यांची नेमकी किंमत किती होती, हे निश्चित करण्यासाठी ईडीने चोक्सी अॅण्ड चोक्सी कंपनीची एक्स्टर्नल आॅडिटर म्हणून नियुक्ती केली होती. कंपनीने काढलेल्या निष्कर्षानुसार शेअर्स जेव्हा विकले गेले त्यावेळी त्यांची किंमत ७० ते ८६ रुपयांदरम्यान असायला हवी होती; परंतु ते दहा रुपये शेअरप्रमाणे ते विकले. ‘सी आयलँड इनव्हेस्टमेंट’लाच दहा रुपये या भावाने ४० लाख शेअर्सची विक्री केल्याबद्दल जुही चावला हिचीही याआधी चौकशी झाली होती. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडियाकडे (सेबी) नोंदणी (लिस्टेड) असलेल्या कंपनीला शेअर्स विदेशातील कंपनीला विकायचे असतील किंवा हस्तांतर करायचे असतील तर त्यासाठी सेबीच्या मार्गदर्शनानुसार व्यवहार करावा लागतो. नोंदणी नसलेल्या (नॉन-लिस्टेड) कंपनीला असाच व्यवहार करायचा असल्यास चार्टर्ड अकाऊंटटंने शेअर्सचे मूल्यमापन करायचे असते, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.
‘ईडी’कडून शाहरूख खानची तब्बल तीन तास चौकशी
By admin | Updated: November 12, 2015 02:52 IST