Join us
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हिस रोड अखेर प्रकाशमय होणार

By admin | Updated: June 7, 2015 03:04 IST

मुलुंड पूर्व द्रुतगती महामार्गावरील सर्व्हीस रोड अखेर प्रकाशमय होणार आहे. महावितरणाने या मार्गावर १८९ पथदिवे लावण्याचा ठराव संमत केला होता.

मुंबई : मुलुंड पूर्व द्रुतगती महामार्गावरील सर्व्हीस रोड अखेर प्रकाशमय होणार आहे. महावितरणाने या मार्गावर १८९ पथदिवे लावण्याचा ठराव संमत केला होता. परंतु निधी अभावी याची अंमलबजावणी झाली नव्हती. मात्र स्थानिकांच्या पाठपुराव्यामुळे अखेर महावितरणकडून उर्वरीत ११० पथदिवे बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.मुलुंड पूर्वेकडील वसंतराव नाईक द्रुतगती मार्गाला लागूनच बसेससाठी सर्व्हीस रोड तयार करण्यात आला आहे. या सर्व्हीस रोडला दिव्यांची सोय नसल्याने भांडुप पंपींग स्टेशन ते मुलुंड चेक नाका दरम्यान अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे रात्री अपरात्री या मार्गात लुटमारीच्या घटना वाढल्या होत्या. तर स्थानिक महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. म्हाडा कॉलनीतील रहिवासी रवींद्र नाईक यांनी २०११ पासून केलेल्या पाठपुराव्याला यश आले आणि संपूर्ण सर्व्हिस रोडला पथदिवे बसविण्याच्या ठरावावर महावितरणाने शिक्कामोर्तब केले. निधीअभावी महापालिका आणि महावितरणामधील करार पुढे जात नव्हता. खोदकामाचा खर्च भरविण्यावरुन महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये नवा वाद समोर आला. त्यामुळे उर्वरीत पदपथ दिवे बसविण्याची प्रक्रिया रखडली.अखेर महावितरणाने पुढाकार घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे २८ लाख ४८ हजार भरले आणि पथदिवे बसविण्याचे काम सुरु झाले. (प्रतिनिधी)