Join us  

चाकरमान्यांनो, आता बाहेरून मागवा जेवण; ३ ते ८ एप्रिल डबेवाले जाणार गावी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 11:20 AM

मुंबईतील मोठ्या प्रमाणावरील नोकरदारवर्ग दुपारच्या जेवणासाठी डबेवाल्यांवर अवलंबून असतो.

मुंबई : अत्यंत धार्मिक वृत्तीचे असलेले मुंबईचे डबेवाले ३ ते ८ एप्रिलदरम्यान रजेवर जाणार आहेत. आपापल्या गावांमधील जत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी हे डबेवाले दरवर्षी आपल्या गावी जातात. त्यामुळे सहा दिवस तरी मुंबईकरांना डबा मिळणार नाही. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांना डबेवाले वेळेत डबे पोहोचविण्याचे काम करतात. वर्षभर प्रचंड धावपळ करणारे मुंबईकर, पुढील महिन्यात मात्र डबेवाले स्वतःसाठी ब्रेक घेणार आहेत.

मुंबईतील मोठ्या प्रमाणावरील नोकरदारवर्ग दुपारच्या जेवणासाठी डबेवाल्यांवर अवलंबून असतो. मुंबईकरांना डबे पुरविणारे डबेवाले हे मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, अकोला, संगमनेर या भागातील गावांमधून येतात. या गावांमध्ये गावातील कुलदेवतांच्या यात्रा सुरू झाल्या असून, त्यासाठी डबेवाले आपापल्या गावी जाणार आहेत. त्यामुळे ३ ते ८ एप्रिलदरम्यान डबे पोहोचविण्याची सेवा डबेवाले बंद ठेवणार आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना बाहेरून जेवण मागवावे लागणार आहे.

दोन सरकारी सुट्ट्यांमुळे दिलासा

३ ते ८ एप्रिलदरम्यान महावीर जयंती आणि गुड फ्रायडे या सरकारी सुट्या येत असल्यामुळे दोन दिवस तरी मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. डबेवाल्यांचीही प्रत्यक्षात सुटी केवळ चारच दिवस होणार आहे. १० एप्रिलपासून डबेवाले पुन्हा नेहमीप्रमाणे कामावर हजर राहून डबे पोहोचविण्याचे काम करतील, असे डबेवाल्यांकडून सांगण्यात आले आहे.डबेवाले रजेवर जाणार असल्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई डबेवाला असोसिएशनने दिलगिरी व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :मुंबई डबेवाले