Join us
Daily Top 2Weekly Top 5

नोकरांनी लंपास केला ५० लाखांचा ऐवज

By admin | Updated: April 10, 2017 06:28 IST

घरमालकाचा फ्लॅट फोडून चौघा कामगारांनी रोख रक्कमेसह ५० लाख रुपयांचे हिरे व सोन्याचे दागिने

मुंबई : घरमालकाचा फ्लॅट फोडून चौघा कामगारांनी रोख रक्कमेसह ५० लाख रुपयांचे हिरे व सोन्याचे दागिने लंपास करण्याची घटना अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात घडली. चौघेजण वेगवेगळ्या ठिकाणी पसार झाले असून, त्यांच्या शोधासाठी पथके बनविण्यात आल्याचे आोशिवरा पोलिसांनी सांगितले. लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील क्रॉस लेन येथील मोनिषा बंगल्यात ए-४ मध्ये मधुकर अगरवाल यांचा फ्लॅट असून, घरकामासाठी चौघे नोकर आहेत. शनिवारी अगरवाल यांच्या कुटुंबातील सर्वच जण एका कार्यक्रमानिमित्त बाहेर गेले असताना, दुपारी त्यांच्या चौघा नोकरांनी फ्लॅटचा लॅच कटावणीने तोडून आत प्रवेश केला. बेडरूमच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या हिऱ्याच्या सहा बांगड्या, दोन ब्रेसलेट, डायमंड व रुबीच्या चार माळा, कानातील रिंगा, चार नेकलेस, सोने व चांदीची नाणी, घड्याळ, गॉगल्स, तसेच रोख एक लाख रुपये घेऊन पसार झाले. साडेतीनच्या सुमारास ते घरातील मंडळी परत आली असता, हा प्रकार उघडकीस आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अगरवाल यांच्या नोकरांनी ही घरफोडी केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचे मोबाइल बंद असून, मुंबईतून बाहेर पलायन केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. (प्रतिनिधी)