Join us

वाळीत प्रकरणांची गंभीर दखल

By admin | Updated: February 3, 2015 23:08 IST

मुरुड तालुक्यातील शिघ्रे गावातील वाळीत प्रकरण सामोपचाराने मिटवण्याचा प्रस्ताव अभिव्यक्ती समर्थन संघटनेने रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांना दिला.

अलिबाग : मुरुड तालुक्यातील शिघ्रे गावातील वाळीत प्रकरण सामोपचाराने मिटवण्याचा प्रस्ताव अभिव्यक्ती समर्थन संघटनेने रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांना दिला. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे व अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक राजा पवार यांनी तत्काळ शिघ्रे गावात जावून ग्रामस्थांची बैठक घेतल्यावर समझोता झाला. दिलेल्या आदेशान्वये शिघ्रेच्या ग्रामसेविका आर.के. पाटील यांनी ग्रामस्थ जगदीश मांदाडकर यांना द्यावयाचा घराचा असेसमेंट उतारा गेल्या महिनाभरात दिला नाही. त्यासाठी मांदाडकर यांना अनेक फेऱ्या माराव्या लागत आहेत. याची गंभीर दखल सोमवारच्या लोकशाही दिनी जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी घेतली. कर्तव्यात कसूर करणाऱ्या ग्रामसेविका पाटील यांना निलंबित करण्याचे सूतोवाच केले. कारवाईबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनाही सांगण्यात आल्याचे भांगे यांनी सांगितले.रविवारी मुरुड-रोहा मार्गावरील केळघर धनगरवाडीमध्ये झालेल्या धनगर जात पंचायतीच्या बैठकीत काही आक्षेपार्ह निर्णय झाल्या प्रकरणी जिल्हाधिकारी भांगे यांनी तत्काळ रोह्याचे प्रांताधिकारी सुभाष भागडे यांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार भागडे यांनी गावाला प्रत्यक्ष भेट देऊन धनगर जात पंचायतीच्या अध्यक्षांसह संबंधित पदाधिकाऱ्यांची चौकशी केली. लोकशाही दिनामध्ये एकूण ५ तक्रार अर्ज आले होते. त्यात महसूल विभाग ३, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रायगडचा १, रायगड जिल्हा परिषदेचा १ यांचा समावेश आहे. पैकी महसूलचे तीन अर्ज यावेळी निकाली काढण्यात आले. तर शिल्लक अर्जामध्ये महसूलचे ११, रायगड जिल्हा परिषदेचे ७, पोलीस विभागाचा एक, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रायगडचे तीन, हेटवणे प्रकल्पाचा एक, खारभूमी सर्व्हेक्षण अन्वेषण विभाग, पेणचे २, सार्वजनिक बांधकाम विभाग महाडचा एक असे एकूण २६ तक्रार अर्ज प्रलंबित आहेत. (प्रतिनिधी)