Join us

महिला सुरक्षेबाबत संवेदनशील

By admin | Updated: March 18, 2015 01:37 IST

राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी लवकरच केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

मुंबई : राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी लवकरच केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. न्या. धर्माधिकारी समितीने राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून १०९ शिफारशी केल्या होत्या. सहा अहवाल दिले होते.मुंबईत उपनगरी रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न काँग्रेसचे अमित देशमुख यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. लोकलमधील प्रवासी महिला सुरक्षित असतात, असा दावा गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी केला खरा; पण विरोधकांचे त्यांच्या उत्तराने समाधान झाले नाही. महिला स्पेशल ट्रेनची संख्या वाढविणार का, असा प्रश्न भाजपाच्या मनीषा चौधरी यांनी विचारला असता महिलांसाठी वेगळ्या लोकलची गरज नाही, असे राज्यमंत्री म्हणाले. (विशेष प्रतिनिधी) लाच घेतल्याच्या प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावलेले अधिकारी, कर्मचारी शासकीय सेवेत असल्याचे आढळल्यानंतर अशांना सेवेतून बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, आता केवळ १५ जणांवर कारवाई होणे बाकी आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहायक नगररचनाकार पांडुरंग शेळके याला १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर कुठली कारवाई करण्यात आली, असा प्रश्न राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आणि इतर सदस्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता. शेळके यांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत घेतलेल्या निर्णयांची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी केली असता विशिष्ट तक्रार आल्यास चौकशी केली जाईल, असे गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी सांगितले. शिक्षा झालेल्या लाचखोर अधिकाऱ्यांना नोटीस बजावून बडतर्फ करण्यात येत आहे. वरच्या न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्याचे कारण सांगून सेवेत कायम राहण्याची शक्कल आजवर शोधली जात होती. यापुढे शिक्षा रद्द झाली नसेल आणि केवळ स्थगिती मिळाली आहे अशा कर्मचाऱ्याला घरी जावे लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.गोराई डम्पिंग ग्राउंडप्रकरणी विरोधकांचा सभात्यागमुंबईतील गोराई डम्पिंग ग्राउंड बंद करताना महापालिका प्रशासनाने सल्लागाराला नियमबाह्य पद्धतीने १ कोटी १९ लाख रुपये अदा केल्याप्रकरणी सरकारने ठोस चौकशीची घोषणा न केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात सभात्याग केला. या प्रकरणी सीआयडी चौकशीची घोषणा केली होती. त्याचे काय झाले, अशी विचारणा विरोधकांनी केली. तेव्हा, या प्रकरणात कधीही सीआयडी चौकशी लावलेली नव्हती, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सरकार या प्रकरणात वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. १३ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या खूनप्रकरणी योग्य तपासकोरेगाव; ता. खेड येथील आकाश संदीप म्हाळुंगकर या १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा खून करण्यात आल्याप्रकरणी चौकशी योग्य दिशेने सुरू आहे. तथापि, अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश गोरे यांच्या प्रश्नात सांगितले.