मुंबई : दिवसभर अस्थिर वातावरण असूनही भारतीय शेअर बाजारांनी बुधवारी अल्प का असेना पण वाढ मिळविली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६८.२२ अंकांनी वाढून २९,४४८.९५ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५.१0 अंकांनी वाढून ८,९३७.७५ अंकांवर बंद झाला. आरोग्य, बँकिंग, वाहन, एफएमसीजी आणि ऊर्जा या क्षेत्रात वाढ दिसून आली. स्मॉलकॅप आणि मिडकॅप कंपन्यांमधील खरेदीचा त्यांना लाभ झाला. सकाळी सेन्सेक्स २९,४३६.७७ अंकांवर तेजीसह उघडला. त्यानंतर तो २९,५१८.३२ आणि २९,१६२.४७ अंकांच्या मध्ये खालीवर होताना दिसून आला. सत्रअखेरीस २९,४४८.९५ अंकांवर बंद झाला. ६८.२२ अंक अथवा 0.२३ अंकाची वाढ त्याने मिळविली. निफ्टीने १५.१0 अंक अथवा 0.१७ अंकाची वाढ मिळवून ८,९३७.७५ अंकांचा बंद दिला आहे. तत्पूर्वी, काल विदेशी गुंतवणूकदारांनी २७८६.२४ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. आशियाई बाजारात जपानचा निक्केई वगळता नरमाईचा कल दिसून आला. चीनने आपल्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा प्रस्तावित दर घटवून ७ टक्क्यांवर आणल्यामुळे आशियातील बाजारांना फटका बसला. चीनचा हा दर गेल्या ११ वर्षांतील सर्वांत कमी दर ठरला आहे.युरोपीय बाजार मात्र सकाळच्या सत्रात तेजी दर्शवीत होते. युरोपच्या सेंट्रल बँकेच्या मासिक बैठकीआधी बाजारात तेजीचा माहोल दिसून आला. तेजीचा लाभ मिळविणाऱ्या बड्या कंपन्यांत सन फार्मा, एचयूएल, एचडीएफसी बँक, सिप्ला, एचडीएफसी, एम अँड एम, डॉ. रेड्डी, विप्रो आणि टाटा पॉवर यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)३0 कंपन्यांचा समावेश असलेल्या सेन्सेक्समधील १३ कंपन्यांचे समभाग वाढले. १७ कंपन्यांचे समभाग घटले. बाजाराची एकूण व्याप्ती नकारात्मक राहिली. १,४६१ कंपन्यांचे समभाग घसरले. १,४0१ कंपन्यांचे समभाग वाढले. ११६ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल घटून ३,६४७.८0 कोटी रुपये झाली. काल ती ६,८६१.२२ कोटी होती.
सेन्सेक्स ६८, तर निफ्टी १५.१0 अंकांनी वाढला
By admin | Updated: March 5, 2015 22:55 IST