मुंबई : भाजपा आणि राज्य सरकार या दोन्हींवर नाराज असलेल्या घटक पक्षांशी समन्वय राखण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज एका समन्वय समितीची घोषणा केली पण या समितीमध्ये शिवसेना सहभागी होणार की नाही या बाबत अद्याप अनिश्चितता आहे. या समितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपाइं आणि शिवसंग्राम सहभागी होणार आहे पण शिवसेनेने त्यास होकार दिलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले. समितीमध्ये शिवसेनाही असेल, असे दानवे यांनी म्हटले आहे.स्वाभिमानी, रिपाइं, रासपा आणि शिवसंग्राम हे भाजपाचे घटक पक्ष आहेत. त्यांच्याशी समन्वय राखण्याचे काम भाजपाने समितीद्वारे करावे. शिवसेना हा भाजपाचा सरकारमधील मित्रपक्ष आहेच. त्यामुळे समितीत जाण्याची गरज नाही, अशी भूमिका शिवसेनेकडून घेतली जात आहे. समितीमध्ये शिवसेनेनेही सहभागी व्हावे यासाठी भाजपाचे राज्यातील नेतृत्व प्रयत्नशील आहे, असे सूत्रांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
समन्वय समितीमध्ये सेनेचा सहभाग अनिश्चित
By admin | Updated: May 21, 2015 02:05 IST