Join us  

ज्येष्ठांची पेन्शन वाढणार; 'या' निर्णयामुळे संकटकाळात वयोवृद्धांना मोठा आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 6:25 PM

भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने घेतलेल्या एका निर्णयामुळे यापैकी काही पेंशनर्सना थोडा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे बँकेतील मुदत ठेवींवरील व्याजाचे दर झपाट्याने कमी होत असल्याने अनेक जेष्ठ नागरीकांची आर्थिक कोंडी होण्याची चिन्हे आहेत. भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने घेतलेल्या एका निर्णयामुळे यापैकी काही पेन्शनर्सना थोडा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. नव्या योजनेमुळे सुमारे सात लाख पेन्शनर्सना आर्थिक फायदा होणार असून सरकारच्या तिजोरीवर मासिक १४०० ते १६०० कोटींचा भार पडेल असा अंदाज आहे.

२००८ सालापर्यंत निवृत्त होणाऱ्या कर्मचा-यांना आपल्या एकूण पेन्शनच्या रकमेपैकी एक तृतियांश निधी एकरकमी घेण्याची मुभा होती. त्यानंतर उर्वरित रकमेच्या आधारावर त्यांना मासिक पेन्शन अदा केली जात होती. ज्या कर्मचाऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब केला होता त्यांना गेली १५ वर्षे दोन तृतियांश रकमेवर पेन्शन अदा केली जात होती. ती आता १०० टक्के रकमेवर मिळणार आहे. मे महिन्यापासून ही पेन्शन द्या असे आदेश असले तरी पीएफ कार्यालयांमधील यंत्रणांमध्ये त्याच्या नोंदी पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे थोडा विलंब होण्याची शक्यता पीएफ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. १५ वर्षे पेन्शनचा कालावधीची अट असल्याने १ एप्रिल, २००५ पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो. तसेच, निवृत्तीनंतर १०० टक्के निधीवर पेन्शन घेणा-यांचा या योजनेत समावेश होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.   

------------------------------------------

फायदा कसा ?

ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी पीएफ कार्यालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी उदाहरणासह स्पष्टीकरण दिले. निवृत्तीच्या वेळी ५००० रुपये पेन्शन लागू असलेल्या कर्मचा-याने जर निवृत्ती वेतनाच्या एकूण रकमेपैकी एक तृतियांश रक्कम काढून घेतली तर त्यांना साधारणतः ३५०० रुपयेच पेन्शन मिळत होती. १५ वर्षे ही पेन्शन घेतल्यानंतर यापुढे दर महिन्याला त्यांना मूळ रक्कम म्हणजेच पाच हजार रुपये पेन्शन मिळू शकेल असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :निवृत्ती वेतनकोरोना सकारात्मक बातम्या