Join us

ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते प्रभूभाई संघवी यांचे निधन

By admin | Updated: January 22, 2015 01:47 IST

ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते प्रभूभाई संघवी यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने शुश्रूषा इस्पितळात निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.

मुंबई : ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते प्रभूभाई संघवी यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने शुश्रूषा इस्पितळात निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले. पुढे १९५१ ते १९५६ अशी पाच वर्षे ते राष्ट्र सेवा दलात पूर्णवेळ कार्यकर्ते होते. दिवंगत ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांचे ते मानसपुत्र मानले जात. समर्थ शिक्षा मंडळ व चॅरिटी ट्रस्ट, डॉ. पी. व्ही. मंडलीक ट्रस्ट, पंचायत भारती या संस्थांचे ते विश्वस्त होते. अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. समाजवादी चळवळीतील आपल्या सहकाऱ्यांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी नुकतेच ‘ध्येयधुंद सोबती’ हे पुस्तक लिहिले होते. मंगळवारी या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन होणार होते. मात्र पहाटेच चार वाजता त्यांचे निधन झाले. वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कारावेळी उषा मेहता, वसंत नाचणे, डॉ. एम. आर. कामत, यशवंत क्षीरसागर, शिवाजी धुरी, सुरेश जागुष्टे, जी. जी. पारेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संघवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी २३ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता दादर येथील भवानी शंकर रोडवरील शारदाश्रम सोसायटीच्या सभागृहात शोकसभा आयोजित केली आहे.