Join us  

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, प्राध्यापिका पुष्पा भावे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2020 9:21 AM

Pushpa Bhave : स्पष्ट वैचारिक भूमिकेतून लोकशाही आणि समतेच्या मूल्यांचा वसा जपणाऱ्या ज्येष्ठ समाजवादी नेत्या प्रा. पुष्पा भावे यांना 2018 मध्ये राजर्षी छत्रपती शाहू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

मुंबई : सुप्रसिद्ध विदुषी, समाजकार्यकर्त्या, विद्यार्थी प्रिय प्राध्यापिका पुष्पा भावे यांचे रात्री १२.३० वाजता निधन झाले. आज सकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

विद्यार्थिदशेपासून राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी पुष्पा भावेंचा संपर्क होता. संयुक्त महाराष्ट्र लढा, गोवामुक्ती लढा अशा सत्याग्रहांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. स्वातंत्र्योत्तर काळात महागाईविरोधी आंदोलनामध्ये अहिल्याताई रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्यासमवेत पुष्पाताई या लाटणे मोर्चातही सहभागी झाल्या होत्या. मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समितीच्या चळवळीला वैचारिक मार्गदर्शन करण्यापासून कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारशी संघर्ष करण्यात पुष्पाताई सर्वात पुढे होत्या. स्त्रीवादी चळवळीची पाठराखण करणाऱ्या पुष्पाताईंनी दलित स्त्रीयांच्या संघटनेमध्ये स्वतंत्र वैचारिक भूमिका घेत संघटन केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये त्या आरंभापासून होत्या. मराठीचे प्राध्यापक आणि दूरदर्शन वरील सुप्रसिद्ध निवेदक अनंत भावे हे त्यांचे पती होत.

डॉ. बाबा आढाव यांच्या असंघटित कामगार चळवळीत हमाल, रिक्षावाले, कागद-काच-पत्रा वेचणारे अशा कष्टकऱ्यांच्या आंदोलनांमध्ये त्या समर्थक राहिल्या. सामाजिक कृतज्ञता निधी या सामाजिक कार्यकर्त्यांना मानधन देणाऱ्या उपक्रमामध्ये पुष्पाताई सतत अग्रभागी असत. स्पष्ट वैचारिक भूमिकेतून लोकशाही आणि समतेच्या मूल्यांचा वसा जपणाऱ्या ज्येष्ठ समाजवादी नेत्या प्रा. पुष्पा भावे यांना 2018 मध्ये राजर्षी छत्रपती शाहू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

टॅग्स :पुषा भावे