मुंबई : विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले ख्यातकीर्त शास्त्रज्ञ प्रा. भालचंद्र माधव उदगांवकर यांचे रविवारी रात्री येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. वाशी येथील राहत्या घरी रविवारी रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना देवनार येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या इस्पितळात हलविण्यात आले पण तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने विज्ञान आणि शिक्षणाच्या क्षेत्रातील भारतीय संशोधनाच्या प्रगतीचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी मुंबईत अंत्यसंस्कार होतील. मूलत: पदार्थविज्ञानाचे अभ्यासक असलेल्या प्रा. उदगांवकर यांनी उभी हयात टाटा मूलभूत संशोधन संस्था आणि भाभा अणुशक्ती केंद्राच्या प्रगतीसाठी वेचली. डॉ. होमी भाभा तसेच त्यांच्या पश्चात अणुशक्ती केंद्राचे संचालकपद भूषविलेल्या प्रत्येक संचालकांशी त्यांचे जवळचे संबंध होते. टाटा मूलभूत संशोधन केंद्रातील अनेकानेक शास्त्रज्ञांचे ते मार्गदर्शक होते.मुंबईतील होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रही त्यांच्या प्रेरणेतून उभे राहिले. १४ विद्या आणि ६४ कलांचा सारख्याच तन्मयतेने आस्वाद घेणाऱ्या या तैलबुद्धीच्या शास्त्रज्ञाने सामाजिक भानाचा वडिलांचा वारसा समर्थपणे पुढे चालविला. त्यांचे वडील माधव उदगांवकर हे मुंबईतील श्रद्धानंद महिलाश्रमाचे संस्थापक होत. प्रा. उदगांवकरांना पद्मविभूषणने सन्मानित केले होते. त्यांच्या पश्चात सुविद्य पत्नी पद्मा तसेच बंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सेसमध्ये अधिष्ठाता असलेले पुत्र जयंत असा परिवार आहे. (प्रतिनिधी)
ज्येष्ठ शास्त्रज्ञ भा.मा. उदगांवकर कालवश
By admin | Updated: December 22, 2014 02:25 IST